पुणे : ‘सारस्वतांनी समाजाला कोणत्याही कल्पनेशिवाय निव्वळ सत्यदर्शन घडवले पाहिजे. मात्र, कथा-कादंबऱ्यांमधून असे होताना दिसत नाही. कादंबरीकारांनी काही लिहले की नवीन पीढी ते लगेच आत्मसात करते. पांडवांना लाक्षागृहात जाळून मारावे म्हणून षडयंत्र रचणारा कर्ण वेगळ्या पद्धतीने रंगवण्यात आला. कर्णानेच धृतराष्ट्राकरवी पांडवांना राज्यातून बाहेर पाडण्यास भाग पाडले. वेळोवेळी त्यांना खिजवण्याचा प्रयत्न केला. या कर्णाला अर्जुनाने तब्बल सहा वेळा पराभूत केले होते. त्याच्या शौर्याचे गुणगाण गायले जाते.

द्रौपदीच्या स्वयंवरात सहभागी झालेल्या कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवण्यातही आले नव्हते. व्यासरचीत महाभारतात सूतपूत्राला वरणार नाही, असे कुठेही द्रौपदीने म्हणलेले दिसत नाही. मुळात असे म्हणण्यासाठी ती स्वतंत्र नव्हतीच. तीच्या स्वयंवराचे आयोजन करण्यात आले होते. तिला वरण्यासाठी मत्स्यभेदाचा पण ठेवण्यात आला होता. कर्ण, शल्य यांसह अन्य कोणत्याही योद्ध्याला तो पूर्ण करता आला नव्हता. महाभारतात दोन वेळा याचा उल्लेख आढळतो. भर द्यूतसभेत द्रौपदीला विवस्त्र करा असे सांगणाऱ्या विकृत मानसिकतेच्या कर्णाचे उदात्तीकरण कशासाठी ?, ग्रंथाचा मूळ गाभा न बदलता सारस्वतांनी सत्यदर्शन घडवायला हवे,’ असे मत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रा. द. के. बर्वे स्वागत कक्षाचे उद्घाटन अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष डॉ. राजीव बर्वे, कार्यवाह सुनिताराजे पवार, बर्वे कुटुंबीय उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यंकर म्हणाले, ‘अभिजात मराठीला संतांची महान परंपरा लाभली आहे. प्रौढ, प्रसन्न आणि तितक्याच गंभीर भाषेतून समाजप्रबोधन करण्याचे काम संतांनी केले. ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव, सर्मथांचा दासबोध, टिळकांचे अग्रलेख, सावरकरांचे शब्द आणि समाज एकरूप व्हावा म्हणून केले गलेले चिंतन या भाषेत आहे. मात्र, आज मराठी सारस्वतांमध्ये वाङमयचौर्यासारख्या अनेक अपप्रवृत्तींचा समावेश झाल्याचे आढळून येते. विचारांचे तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान कुठेतरी सुटत चालले आहे.’ प्रा. जोशी म्हणाले, ‘आजच्या काळात संस्थात्मक काम करणे अवघड झाले आहे. समाज अतिसंवेदनशील झाला आहे. संस्था चालवताना चांगले काम करायचे असेल, तर सहन शीलता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.’