पुणे : ‘न्यायमूर्ती रानडे युगातील प्रार्थनावादी व्याख्यानमाला टिळक युगात राष्ट्रनिष्ठ झाली. गांधीयुगात स्वातंत्र्यसन्मुख झाली आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर तिने नवभारताच्या उत्कर्षाचे स्वप्न पाहिले. मराठी समाजमानस समृद्ध करणारी वसंत व्याख्यानमाला हे महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक जीवनाचे होकायंत्र आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘विचारांचा वसंत फुलविणारी व्याख्यानमाला’ या विषयावर प्रा. मिलिंद जोशी यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रा. जोशी म्हणाले, ‘वसंत व्याख्यानमाला हे मुक्त ज्ञानसत्र असल्याने ते सर्व मतांच्या, पंथांच्या आणि जातीधर्माच्या लोकांना विचार मांडण्यासाठी खुले असावे. कोणताही विषय किंवा अभिरुची वर्ज्य असू नये, अशी न्यायमूर्ती रानडे यांची भूमिका होती. तिला अनुसरून व्याख्यानमालेची दीडशे वर्षे वाटचाल सुरू आहे. देशात घडलेल्या घटनांचे साद पडसाद व्याख्यानमालेत नेहमीच उमटत राहिले. सर्व व्याख्यानमालांची जननी असलेली वसंत व्याख्यानमाला हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे.’
‘ग्रंथांचा उदय होण्यापूर्वी वक्तृत्वाने फिरती ज्ञानपोई चालवली. आजच्या समाजातील सर्व विषय भावनिक आणि अतिसंवेदनशील झाले आहेत. त्यामुळे तर्कशुद्ध विवेचनाला अर्थ उरला नाही. व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची आज हानी होताना दिसत असली तरीही नेटक्या बोलण्याचे महत्त्व थोडेही कमी होणार नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, संस्कृती यांचे आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते, त्यामुळे वाचिक अभिव्यक्तीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,’ याकडे जोशी यांनी लक्ष वेधले.
वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात १९४९ मध्ये एका व्याख्यानाच्या तिकीटविक्रीचे सर्व उत्पन्न पुणे विद्यापीठाच्या मदतीसाठी दिले गेले. हे व्याख्यान प्रा. ना. सी. फडके यांचे होते. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार अध्यक्षस्थानी होते. हे व्याख्यान मदतीसाठी असल्याने पदाधिकारीदेखील तिकीट काढून आले होते. या व्याख्यानाचे उत्पन्न ६०१ रुपये होते. त्यात संयोजकांनी ४०० रुपयांची भर घालून १००१ रुपयांची देणगी पुणे विद्यापीठाला दिली आणि ज्ञानपीठ हे नाव सार्थ केले.
प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ