गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता मालवाहू जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

गणेशखिंड रस्त्यावरून अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहने, महापालिकेची वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच मेट्रोच्या कामासाठीच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. या रस्त्यावरून ये-जा करण्यास जड मालवाहू वाहनांना मनाई करण्यात आली आहे. दिवसा तसेच रात्रीही मालवाहू वाहनांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

हेही वाचा – काळाचा घाला! पुणे-नाशिक महामार्ग ओलांडताना कारची धडक; पाच महिलांचा मृत्यू

सोलापूर रस्ता, हडपसर, पुणे शहरातून मुंबईकडे जाणारी जड वाहने, मालवाहू वाहने, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनांनी हडपसर, सासवड रस्ता, मंतरवाडी फाटा, कात्रज-कोंढवा रस्ता, कात्रजमार्गे मुंबईकडे जावे. नगर रस्त्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी नगर रस्ता, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डाॅ. आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, पोल्ट्री फार्म चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने इच्छितस्थळी जावे.

जड वाहतूकीस बंद असणारे रस्ते

  • गणेशखिंड रस्ता – संचेती चौक ते राजीव गांधी पूल (दोन्ही बाजूने)
  • बाणेर रस्ता – राधा चौक ते शिवाजीनगरकडे येण्यासाठी
  • पाषाण रस्ता – सूस तसेच शिवाजीनगरकडे येण्यासाठी
  • सेनापती बापट रस्ता – विधी महाविद्यालय रस्त्यावरून सेनापती बापट रस्ता चौकाकडे येणारी वाहने

हेही वाचा – पुणे : भाजपाच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार शिगेला, अंदाजपत्रक विकण्याचाही प्रकार, रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासनेंवर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (आचार्य आनंदऋषीजी चौक) परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या भागातील वाहतूक बदलांविषयी गणेशखिंड रस्त्यावरील शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले.