पुणे प्रतिनिधी: भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष भाजपाचे नेते खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या विरोधात मागील १२ दिवसांपासून खेळाडू जंतर मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. त्याच दरम्यान बुधवारी रात्री खेळाडू आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते संजय बालगुडे यांनी मुलांची प्रतीकात्मक कुस्ती लावून ब्रिजभूषण सिंह यांचा निषेध नोंदविला. तर आंदोलनकर्त्यां कुस्तीगीरांना पाठिंबादेखील दर्शविला.
यावेळी संजय बालगुडे म्हणाले की, कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी १२ दिवसांपासून खेळाडू ठिय्या आंदोलन करीत आहेत. ज्या महिला कु्स्तीगीरांनी देशासाठी पदके जिंकली आहेत, त्यांना अत्याचाराच्या घटनेला सामोरे जावे लागत आहे. ही बाब निषेधार्ह असून ब्रिजभूषण सिंह यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही प्रतीकात्मक कुस्ती लावून निषेध नोंदविला आहे. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील त्यांनी या वेळी दिला.