जगातील तिसरे सर्वोच्च शिखर असलेल्या ‘माउंट कांचनजुंगा’वर एकाच दिवशी एकाच संस्थेतील दहा गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करत इतिहास रचला आहे. गिरिप्रेमीच्या या मोहिमेवर आधारित ‘शिखररत्न कांचनजुंगा’ या पुस्तकाचे हावरे ग्रुपचे संचालक डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन झाले.

हेही वाचा- येरवडा कारागृहातल्या कैद्यांची सुबक कारागिरी! आकर्षक वस्तूंचा दिवाळीसाठी भरला मेळावा

रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाचे लेखन या मोहिमेचे नेते आणि ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि एव्हरेस्टवीर भूषण हर्षे यांनी केले आहे. यावेळी गिरिप्रेमीच्या संस्थापक- अध्यक्षा उषःप्रभा पागे, संस्थापक आनंद पाळंदे, रोहन प्रकाशनचे संचालक प्रदीप चंपानेरकर, गिरिप्रेमीचे सचिव विवेक शिवदे उपस्थित होते.

गिरिप्रेमी संस्थेने २०१९ साली जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या कांचनजुंगा शिखरावर मोहीम आयोजित केली होती. एव्हरेस्टपेक्षाही चढाईसाठी कठीण अशी ख्याती असलेल्या या शिखरावरील मोहीम गिरिप्रेमीच्या सदस्यांनी यशस्वी करून इतिहास रचला. या संपूर्ण मोहिमेच्या उभारणीपासून ते प्रत्यक्ष शिखर सर करण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात रेखाटण्यात आला आहे.

हेही वाचा- शालेय स्तरावर ‘कौशल्य केंद्र स्थापन करा’; कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

डॉ. हावरे यावेळी म्हणाले, की अशा वेगळ्या मोहिमांचे दस्तऐवजीकरण होणे महत्त्वाचे असते. या पुस्तकाच्या रूपाने ते झाले आहे. यातून गिर्यारोहणाचा विधायक प्रवास सर्वदूर होण्यास मदत होईल. झिरपे म्हणाले, की गिर्यारोहण मोहिमांचे अनुभव विलक्षण असतात. प्रत्येक मोहिमेत काहीतरी वेगळं घडते, त्यामुळे सांगण्यासारखे बरेच काही असते. कांचनजुंगा मोहिमेत तर अनुभवांचे मोठे गाठोडे आमच्या सोबत होते. या पुस्तकातून आम्ही याच संघर्षाची, जिद्दीची, मेहनतीची, सातत्याची, कल्पकतेची, विचारांच्या कक्षा रुंदावण्याची, यशाची- अपयशाची, भीतीची, विजयाची अन् आत्मशांतीची गोष्ट सांगतो आहोत. हर्षे म्हणाले, की गिर्यारोहण करत असताना डायरी लिहिण्याची सवय ठेवल्याने या विलक्षण अनुभवांचे पुस्तक होऊ शकले.

हेही वाचा- मुसळधारांच्या तडाख्यात ; राज्यातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू ; कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंपानेरकर यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पागे, कांचनजुंगा मोहिमेतील शिखरवीर विवेक शिवदे, जितेंद्र गवारे, आशिष माने, कृष्णा ढोकले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पद्मजा धन्वी यांनी सूत्रसंचालन केले. या पुस्तकातून मिळणारा निधी गिरिप्रेमीच्या आगामी ‘माउंट मेरू’ या मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे.