पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या फेरीत ४२ हजार ७०९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, त्यातील २४ हजार ७१८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. आता प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून ६ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ११ हजार ४३० जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत १ लाख ५५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ६९ हजार ११६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून प्रवेश अर्जाचा भाग दोन भरला. त्यापैकी ४२ हजार ७०९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २४ हजार ७१८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, ६ हजार ८२० विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तर ३ हजार ५१५ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.
प्रवेशाच्या पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आता कागदपत्रांची पडताळणी करून ६ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी प्रतिबंध करण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील त्यांच्या लॉग इनद्वारे प्रोसिड फॉर ॲडमिशन हा पर्याय निवडून प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रवेशाची दुसरी फेरी ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
शाखानिहाय प्रवेश
विज्ञान – २१ हजार ५३४
वाणिज्य – १६ हजार १४१
कला – ४ हजार १९७
व्यवसाय अभ्यासक्रम – ८३७