पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने चौघांची ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सख्ख्या भावांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गौरव प्रदीपकुमार चंद्र (वय ४९, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पीटर शुक्ला आणि सॅमसन शुक्ला (रा. कॅलिफोर्निया अपार्टमेंट, एनआयबीएम रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव चंद्र यांची आरोपी पीटर आणि सॅमसन यांच्याशी एका परिचितामार्फत ओळख झाली होती. आरोपींनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा तीन ते सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.
चंद्र यांच्यासह परिचितांनी आरोपींच्या व्यवसायात ९२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी त्यांना परतावा दिला नाही. परतावा न दिल्याने चंद्र आणि परिचितांनी शुक्ला यांना पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी परतावा, तसेच गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
शहरात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.