जेजुरी : पुणे शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रविवारी अवघड दिवे घाट पार करून संत सोपानकाकांच्या सासवड नगरीमध्ये विसावला. सासवड नगरीत प्रवेश केल्यानंतर समाजआरती झाली. माउलींची पालखी दोन दिवस सासवड मुक्कामी असणार आहे.
पुण्यामध्ये माउलींच्या पादुकांची पहाटे पूजा, आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला. हडपसर, वडकीनाला येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. एकादशी असल्याने वारकरी बांधवांना ठिकठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले. पुणे ते सासवड हा आषाढी वारीतील सर्वांत मोठा ३२ किलोमीटरचा अवघड टप्पा आहे. दुपारी तीन वाजता पालखी सोहळ्याने अवघड दिवे घाट चढण्यास सुरुवात केली. नागमोडी वळणांचा, हिरवाईने नटलेला दिवेघाटात पावसाने उघडीप दिल्याने वातावरण आल्हाददायक होते. टाळ, मृदंगाच्या जयघोषात विठूनामाचा गजर करीत पालखी सोहळा पुढे निघाला.
दिवे घाटात चढ मोठा असल्याने माउलींच्या चांदीच्या पालखी रथाला एकूण पाच बैलजोड्या जुंपल्या जातात. दिवे येथील शेतकरी राहुल त्र्यंबक झेंडे आणि रमेश बबन शिंदे तसेच सचिन शिवाजी झेंडे यांच्या बैलजोडींना हा मान मिळाला. बैल जोड्यांशिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून रथावर इलेक्ट्रिक मोटरही बसवण्यात आली होती. दिवे घाट चढताना थकवा येऊ नये म्हणून अनेक दिंड्यांमध्ये टाळ मृदंगाच्या तालावर निरनिराळी अभंग गीते म्हणत वारकरी नाचत होते. आवाज टिपेला पोहोचत होता. दिवेघाट चढून वर आल्यावर माउलींनीच आपल्याला घाट चढण्याचे बळ दिले, असे भाव वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते.
सात किलोमीटरचा दिवेघाट पार करून माउलींचा पालखी सोहळा वर आला तेव्हा हजारो भाविक पालखी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, सासवडचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी पालखीचे स्वागत केले. वडकी येथून पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सात किलोमीटर पायी चालताना वारकऱ्यांशी संवाद साधला. मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने सारा परिसर उजळला होता. ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू संत सोपानकाकांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती.