पुणे : शहरातील गंभीर गु्न्हे रोखण्यासाठी बसविण्यात आलेले एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे लवकरच कार्यान्वित होणार आहेत. कॅमेरे, तसेच नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे.शहरातील गंभीर गुन्हे रोखणे, तसेच सराइतांना टिपण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांत एआय तंत्रज्ञानावर आधारित १२०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

हे कॅमेरे बसविण्यासाठी राज्य शासनाने ४६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कॅमेऱ्यांवरील चित्रीकरण, तसेच तांत्रिक देखरेख ठेवण्यासाठी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्ष (कमांड सेंटर) सुरू करण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष, तसेच कॅमेऱ्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिली.

पुणे पोलिसांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर छापा टाकून पोलिसांनी ३६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.