पिंपरी- चिंचवड : भविष्यातील मेट्रो विस्तारीकरणाच्या डीपीआर बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. फुगेवाडी येथील मेट्रोच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज ही पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवारांचा दौरा सुरू झाला आहे.
सकाळी सात वाजता अजित पवारांनी मेट्रोसंदर्भात बैठक घेऊन भविष्यातील वाहतुकीबाबत आराखडा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
श्रावण हर्डीकर म्हणाले, बैठकीत पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो विस्तराबाबत सादरीकरण करण्यात आलं. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये भक्ती- शक्ती चौक ते मुकाई चौक ते वाकड ते पिंपळे सौदागर कोकणे चौक ते नाशिक फाटा मार्गे चाकण मेट्रोचा डिपीआर आहे. याबाबत ही चर्चा झाली आहे. पुढे ते म्हणाले, पुण्यात देखील डबल डेक्कर फ्लाय ओव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने सादरीकरण झालेलं आहे. भविष्यात आराखडा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाकण ला जाणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. पिंपरी ते निगडीच मेट्रो लाईन च काम २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.
