पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर याचा ५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीतील दोघांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली. या खून प्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, शिवराज आंदेकर, यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मेरगु, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वृंदावनी वाडेकर अशा तेरा आरोपी विरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तेरा आरोपींपैकी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना ६ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. उर्वरित अकरा आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली. याच दरम्यान बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण आणि सुजल मेरगु या सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी आरोपींना पोलिसांबद्दल काही तक्रार आहे का, असे विचारले. त्यावर मुख्य आरोपी बंडू आंदेकर म्हणाले की, “गुन्हा घडला तेव्हा मी केरळमध्ये होतो आणि मला या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.”
सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, ५ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष कोमकर या तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कधी कट रचला, या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, पिस्तुल आणि त्यावेळी वापरलेले कपडे या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी.
आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी बंडू आंदेकर घटनेच्या वेळी परराज्यात होते. ते त्यांच्या नातवाचा खून का करतील, या प्रकरणात त्यांना जाणूनबुजून गोवण्यात आले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सहा आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.