पुणे : बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामाला पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच काम सुरू करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर महापालिका त्यासाठी सल्लागार नेमणार आहे. या रस्त्याची आज (शुक्रवारी) महापालिकेचे अधिकारी पाहणी करणार आहेत.

सेनापती बापट रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाताना आयएलएस विधी महाविद्यालय रस्त्याने जावे लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याबरोबरच येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सेनापती बापट रस्ता आणि कोथरूड परिसराला जोडण्यासाठी बालभारती-पौड फाटा या शंभर फुटी रस्त्याची संकल्पना मांडण्यात आली होती.

या रस्त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल, असा दावा करून डॉ. सुषमा दाते आणि आयएलएस विधी महाविद्यालयाचे प्रशासन या प्रकरणी न्यायालयात गेले होते. वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला आक्षेप घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना बालभारती ते पौड फाटा रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी पर्यावरण विभागाची मान्यता घ्यावी, असे सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विभागाची परवानगी घेण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण विभागाची परवानगी दोन महिन्यांत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

नक्की काय आहे प्रकरण

हा रस्ता वेताळ टेकडीवरून हा रस्ता जात असल्याने यामुळे आजूबाजूच्या पर्यावरणाची हानी होईल, मोठ्या संख्येने झाडे तोडली जातील. येथील प्राणी, पक्ष्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल, असा आरोप करून पर्यावरणवाद्यांनी या कामाला विरोध केला आहे.

या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने पुढील कार्यवाहीची तयारी सुरू केली आहे. या रस्त्याचा काही भाग जमिनीवरून तर काही भाग उन्नत असेल. उन्नत मार्गामुळे टेकडी फोडावी लागणार नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. हा रस्ता रॅम्पसह सुमारे दोन किलोमीटर अंतराचा असेल.

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी दिली होती. त्यावर आक्षेप घेत पर्यावरणवादी न्यायालय गेल्यास स्थगिती मिळू नये, यासाठी महापालिकेने न्यायालयात ‘ कॅव्हेट ‘ देखील दाखल केले होते. हा रस्ता झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुटणार असून वाहनचालकांचा वेळ देखील वाचणार आहे.