पुणे : ‘शहरातील कात्रज, कोंढवा आणि येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटिंग करून त्यांची विक्री, तसेच अवैध उत्खननप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत,’ असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंत्रालयातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
‘कात्रज, कोंढवा आणि येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, ती पूर्णपणे काढण्यात आली नाहीत. विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करू नये. अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही. दंड भरून घेतला म्हणजे कार्यवाही झाली, असे होत नाही. संबंधितांवर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच, या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवरदेखील तीन दिवसांत गुन्हे दाखल करावेत,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.
‘अतिक्रमणे आणि बेकायदा अतिक्रमित प्लॉटिंगबाबत त्या विभागातील अधिकारी, तहसीलदार आणि महानगरपालिका आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन दिवसांत कारवाई करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा,’ अशी सूचनाही बावनकुळे यांनी केली.