पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडून (महामेट्रो) डेक्कन जिमखाना ते पेठ भाग जोडणाऱ्या भिडे पुलाच्या वर उन्नत पादचारी पूल बांधण्यात येत आहे. या उन्नत पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बाबा भिडे पूल १५ नोव्हेंबरपर्यंत खुला करण्याचा निर्णय मंगळवारी ‘महामेट्रो’कडून घेण्यात आला.
‘पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी खुला राहील. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी पुन्हा पूल बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल,’ अशी माहिती ‘महामेट्रो’चे अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिली.
‘महामेट्रो’कडून भिडे पुलावर उन्नत पादचारी पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भिडे पूल बंद करण्यात आला. शहरातील पूर्व आणि पश्चिम भाग भिडे पुलामुळे जोडला जात असल्याने हा पूल बंद केल्याने वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दिवसभर या पुलावरून वाहनांची वर्दळ कायम होत असल्याने विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसला जाण्या-येण्यासाठी या पुलाचा मोठा वापर होताे. परंतु, हा पूल वाहतुकसाठी बंद केल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांनी जावे लागत आहे.
शहरातील डेक्कन, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आदी रस्ते अरूंद आणि त्यात अतिक्रमण असल्याने या मार्गावर सातत्याने वाहनांच्या रांगा लागतात. वादावादी, अपघात अशा समस्या वाढत असून हा भिडे पूल खुला असल्यावर वाहतुकीचा ताण कमी होतो. दिवाळी सणानिमित्त हा पुल खुला करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या पुलाच्या कामाबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार महामेट्रो प्रशासनाने दिवाळीनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करून कामाचा वेग वाढवला. महामेट्रोकडून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा पूल तात्पुरता खुला करण्यात आला असला, तरी पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडी आणि संभ्रम अशा समस्यांना सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुलाच ठेवावा असे मत नारायण पेठेतील स्थानिक प्रियांका देसाई यांनी व्यक्त केले.
या उन्नत पादचारी पुलाच्या बांधकामामुळे मुठा नदीवरील भिडे पूल वारंवार बंद-खुला करण्याच्या धरसोड निर्णयामुळे वाहनचालकांच्या समस्या वाढल्या आहेत. १५ नोव्हेंबरनंतर पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याने नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता आणि डेक्कन परिसरातील रहिवाशांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालका्ंना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
