पुणे : ‘सायबर गुन्ह्यांमधील वाढती संख्या आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, पुण्यातील सध्याचे एकमेव सायबर पोलीस ठाणे अपुरे पडत आहे. त्यामुळे पाचही परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक सायबर ठाणे निर्माण करावे,’ अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

‘पुण्यातून अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या बनावट धमक्या देऊन गिफ्ट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या खराडी येथील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला. शहरातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे,’ असे नमूद करून, ‘२०२२ मध्ये १० हजार ६९२ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, २०२३ मध्ये ही संख्या ११ हजार ९७४ होती. तर, २०२४ मध्ये तब्बल १२ हजार ९५४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. याचाच अर्थ सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी केवळ ६,२०४ (२०२२), ७,०६९ (२०२३) आणि १,७३० (२०२४) गुन्ह्यांचाच न्यायालयीन निकाल लागलेला असून, उर्वरित प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत,’ याकडे रासने यांनी लक्ष वेधले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुण्यातील पाच परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक अशी पाच सायबर पोलीस ठाणी स्थापन केल्यास सायबर गुन्ह्यांची जलद आणि तांत्रिक तपासणी शक्य होईल. तसेच अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, ई-ऑफिस प्रणालीद्वारे सायबर पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण करावे, प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती करावी,’ अशा मागण्याही रासने यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.