पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा पाठलाग, तसेच अवमानास्पद टिप्पणी करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचा पदाधिकारी ओंकार कदम याच्यासह सहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओंकार कदम, अक्षय कांबळे यांच्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम आणि साथीदारांनी कोणतेही शासकीय काम नसताना आरोग्य विभागाच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयीन सहकारी उपस्थित असताना त्यांनी अवमानस्पद टिप्पणी केली. अश्लील शब्द उचारले. कदम आणि सहकाऱ्यांनी पाठलाग केला. कदम आणि साथीदारांच्या कृत्यामुळे मानसिक त्रास झाला, तसेच कार्यालयात जाण्यास भीती वाटत आहे, असे महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कदम आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ओंकार कदम आणि साथीदारांना महापालिका भवन आणि महापालिकेशी संबंधित सर्व मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.