पुणे : गुरुवार पेठेत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ११ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बिबवेवाडी भागात राहायला आहेत. गुरुवार पेठेतील रोशनी हाऊसिंग सोसायटीत त्यांची सदनिका आहे. त्यांची सदनिका बंद होती.
चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. याच सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेचे सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला. चोरट्यांनी दोन्ही सदनिकेतून ११ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत. गुरुवार पेठ गजबजलेला भाग आहे. एकाच सोसायटीतील दोन सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर घबराट उडाली.गजबजलेल्या सदाशिव पेठेतील बॅरिस्टर गाडगीळ स्ट्रीट परिसरात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून १३ लाखांचे दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती.
विश्रांतवाडीत घरफोडी
विश्रांतवाडीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६५ हजारांची रोकड आणि दागिने असा दोन लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अहे. तक्रारदार एकतानगर परिसरातील तिरुपती कॅम्पस सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.