पुणे : कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ८९ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सनदी लेखापालासह तिघांना पर्वती पोलिसांनी अटक केली. सनदी लेखापाल सिद्धार्थ जयराम गावडे (वय ३८,रा. आंबेगाव), विकास दामोदर खुडे (वय ४३, रा. भारती विद्यापीठ परिसर, कात्रज), पंढरीनाथ बाळासाहेब साबळे (वय ४४, रा. नऱ्हे, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘याप्रकरणी एका व्यावसायिक तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण व्यावसायिक नऱ्हे परिसरात राहायला आहे. फिर्यादीच्या पत्नीला व्यवसायासाठी सात कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. सनदी लेखापाल गावडे याच्याशी फिर्यादी व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीचा परिचय होता. गावडेने त्यांना सात कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी काही पैसे भरावे लागतील, असे त्याने सांगितले. गावडे याने एका पतसंस्थेकडून कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले होते,’ अशी माहिती पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.
गावडे याचे पुणे-सातारा रस्त्यावर कार्यालय आहे. गावडे याच्या खात्यावर काही रक्कम व्यावसायिक दाम्पत्याने जमा केली, तसेच त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीकडून गावडे आणि साथीदारांनी कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने वेळोवेळी ८९ लाख १३ हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर कर्ज मंजूर करून दिले नाही. कर्ज न दिल्याने व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीने विचारणा केली. तेव्हा गावडे आणि साथीदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गावडे याच्या कार्यालयातील महिलेसह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.