पुणे : जगातील सर्वांत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या रपुंझेल सिंड्रोमचा रुग्ण पुण्यात आढळता आहे. एका १० वर्षीय मुलीला या विकाराची बाधा झाली. त्यामुळे तिने केसांसह अन्य वस्तू गिळल्या होत्या. तिच्या पोटातून २८० ग्रॅम वजनाचा केस आणि दोऱ्यांचा गोळा डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढला आहे.
ही मुलगी गेल्या दहा महिन्यांपासून होणाऱ्या पोटदुखीने त्रस्त होती. औषधोपचारांनंतरही तिला आराम मिळत नव्हता. त्यामुळे तिला सिम्बायोसिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. कल्पेश पाटील यांनी या मुलीची तपासणी केली. तपासणीदरम्यान पोटाच्या वरच्या भागात एक मोठा आणि कठीण गोळा जाणवत होता. सीटी स्कॅनमध्ये पोट पूर्णपणे व्यापून टाकलेला आणि लहान आतड्यांपर्यंत गेलेला मोठा गोळा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सुमारे अडीच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत डॉ. कल्पेश पाटील आणि त्यांच्या पथकाने केस आणि दोऱ्यांचा घट्ट झालेला २८० ग्रॅम वजनाचा गोळा मुलीच्या पोटातून बाहेर काढला. काही दोरे मुलीच्या पित्ताशयपर्यंत गेले होते. त्यामुळे गुंतागुंत वाढून तिच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. वेळीच हा गोळा पोटातून काढून टाकण्यात आल्याने हा धोका टळला.
शस्त्रक्रियेनंतर या मुलीला बाल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिला काही दिवस तोंडावाटे काहीही देण्यात आले नाही. सातव्या दिवशी तिला द्रव आहार देणे सुरू करण्यात आले. आठव्या दिवशी तिच्या मलावाटे काही दोरे बाहेर आले. आता तिची प्रकृती स्थिर असून, ती व्यवस्थित आहार घेत आहे, लवकरच तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
रपुंझेल सिंड्रोम म्हणजे काय?
रपुंझेल सिंड्रोम हा दुर्मीळ पोटविकार आहे. एका परिकथेतील रपुंझेल या लांब केसाच्या मुलीच्या पात्रावरून या विकाराला हे नाव मिळाले आहे. या विकाराचा पहिला रुग्ण १९६८ मध्ये नोंदविण्यात आला. आतापर्यंत जगभरात या विकाराच्या केवळ १०० रुग्णांची नोंद झाली आहे. केस गिळले गेल्याने त्यांचा पोटात गोळा तयार होऊन हा विकार होतो. सर्वसाधारणपणे १३ ते १९ वयोगटातील मुलींमध्ये हा विकार आढळून येतो.
