पुणे : विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५’ हा अनोखा कार्यक्रम २२ ते २५ मे दरम्यान गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा, स्पर्धांची रेलचेल असून, या कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी पुणे बालपुस्तक जत्रामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. संवाद पुणेचे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. पुणे पुस्तक महोत्सव, राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या हस्ते २२ मे रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन होणार आहे.

‘पुणे बालपुस्तक जत्रा या विनामूल्य उपक्रमातून मुलांना पारंपरिक खेळ, पुस्तकांची गोडी लावण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमातून भविष्यातील चांगले वाचक घडविण्याचा विचार आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांतून मुलांचे लेखन-वाचन-आकलनकौशल्य वाढवण्याची प्रक्रिया सहजपणे होऊ शकते. तसेच पालक, शिक्षकांनाही यात सहभागी होता येणार आहे,’ असे पांडे यांनी सांगितले.

बालपणीच्या खेळांची गंमत

‘आपले अंगण’ या उपक्रमात मुला-मुलींना विटी-दांडू, चाक फिरवणे, भोवरा फिरवणे, भातुकली असे १६ जुने खेळ खेळण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाची झलक जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात मंगळवारी (२० मे) दुपारी ४ वाजता देण्यात येणार आहे. बालसाहित्यिक राजीव तांबे, कवी संदीप खरे, अभिनेते प्रवीण तरडे, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मिलिंद भोई, अभिनेत्री पूर्वा शिंदे, तेजस्विनी लोणारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच, रेवा पांडे यांनी जुन्या खेळांवर आधारित संकलन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आहे, असे महाजन यांनी सांगितले.

पुणे बालपुस्तक जत्रेतील कार्यक्रम

२२ मे (गुरुवार) : सायं. ५ वाजता उद्घाटन. ५.३० वाजता जादूचे प्रयोग.

२३ मे (शुक्रवार): सकाळी ११ वाजता चैताली माजगावकर-भंडारी यांचा ‘हा खेळ सावल्यांचा’ (पपेट शो), शिक्षण विवेकचे ताई-दादा यांची प्रस्तुती. दुपारी २ वाजता ‘अभिजात मराठी भाषिक खेळ’, मुलांनी लिहिलेल्या गोष्टींचे सादरीकरण (पुणे मराठी ग्रंथालय – बाल विभाग). दुपारी ३.३० वा. ‘गोष्टींची डायरी’. सायं. ४.३० वा. अथांग सागर मुजुमले पाटील यांचे ‘शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिक.’ सायं. ५.३० वा. ‘लेखक तुमच्या भेटीला!’ – सहभाग : डॉ. संगीता बर्वे, ल. म. कडू, आबा महाजन, एकनाथ आव्हाड.

२४ मे (शनिवार) : स. ११ ते १ सदानंद काळे यांचे ‘सलाम भारतीय वायुसेनेला’ ही विमान-विज्ञान प्रात्यक्षिके. दुपारी २ ते ५ – ‘कथालेखन कसे करावे’ – लेखक राजीव तांबे यांचे सत्र. सायंकाळी ५ ते ६ चारुहास पंडित यांचा ‘चिंटू तुमच्या भेटीला’ कार्यक्रम.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ मे (रविवार) स. ११ वा. – ‘स्क्रीन टाइमचा राक्षस’ या विषयावरील परिसंवादात डॉ. श्रुती पानसे, स्मिता पाटील, अर्चना कुडतरकर यांचा सहभाग. दुपारी ४ वा. प्रकाश पारखी यांचा ‘नकलानगरी’ कार्यक्रम. सायं. ५ वा. श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘फुलपाखरू’ पुस्तकाचे प्रकाशन. सायं. ६.०० वा. ‘ड्रम सर्कल’ या कार्यक्रमाने समारोप.