पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची संधी न मिळालेल्यांना नाव नोंदणीची संधी मिळणार असून, नावे वगळणे आणि पत्त्यामधील दुरुस्ती करण्याची संधीही मिळणार आहे. मात्र, नवीन मतदारांना महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करता येणार की नाही, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या नाहीत.
महापालिका निवडणूक चार महिन्यांत घेण्यात यावी, असे आदेश मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यातच पुणे महापालिकेची निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. सन २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे आगामी महापालिका निवडणूक होणार असून, २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मतदार नोंदणीसाठी मोहीम घेण्यात येणार आहे. ही मोहीम दोन ते अडीच महिन्यांसाठी राबविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे. मतदार यादीतील नावामध्ये, पत्त्यामध्ये किंवा अन्य कोणत्याही माहितीमध्ये बदल करायचा असल्यास तो बदल करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. ही अद्ययावत मतदार यादी निवडणूक आयोगाला दिली जाणार आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या वापरण्याला आक्षेप घेण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात बोगस मतदारांची नोंद; तसेच काही मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले होते.
‘मतदार नोंदणीसाठी जुलै महिन्यात मोहीम घेतली जाणार आहे. मतदार यादीत नाव नोंदविणे, दुरुस्ती करणे ही प्रक्रिया निरंतर चालू असते.’ असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी सांगितले.
‘निवडणुकीसाठी कोणती मतदार यादी ग्राह्य धरली जाणार, याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जातो. याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. नवीन मतदार नोंदणीची मोहीम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली जाणार आहे.
मीनल कळसकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी
विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात बोगस मतदारांची नोंद; तसेच काही मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्याच येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये वापरणे म्हणजे विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारांच्या भरवशावर निवडणूक जिंकण्याच्या भ्रष्ट प्रयोगाची पुनरावृत्ती ठरेल.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.ॲड. असीम सरोदे