पुणे : नागरिकांकडे असलेली मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी ‘अभय योजना’ राबविली जाणार आहे. यासाठी थकबाकीच्या दंडावर ७५ टक्के सवलत मिळणार आहे. यापूर्वीच्या ‘अभय योजने’चा लाभ घेतलेल्या थकबाकीदार मिळकतदारांना मात्र याची सवलत दिली जाणार नाही. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अभय योजना राबिणार असल्याची माहिती दिली.

महापालिकेची मिळकरदारांकडे सुमारे बारा हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ३ हजार १५८ कोटी मुळ मिळकतकराची थकबाकी असून, त्यावर दंडाची रक्कम ९ हजार कोटी रुपयांची आहे. वर्षानुवर्षे हा मिळकतकर थकीत असल्याने महापालिका प्रत्येक महिन्याला त्यावर दोन टक्के व्याज आकारते. परिणामी, थकबाकीची रक्कम वाढतच असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘अभय योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे प्रलंबित थकबाकी वसूल होऊन महापालिकेच्या तिजोरीत निधी जमा होईल, असे महापालिका आयुक्त राम यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, मिळकतकर विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ उपस्थित होते.

ही योजना आणताना यापूर्वीच्या ‘अभय योजने’चा फायदा घेत थकबाकी भरलेल्या आणि पुन्हा थकबाकीदार झालेल्या मिळकतदारांना याचा फायदा देऊ नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली होती. ‘या मागणीची दखल घेऊन नियमित मिळकतकर भरणाऱ्यांवरदेखील कोणताही अन्याय होणार नाही.

महापालिकेची प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी ‘अभय योजना’ आणण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून सुरू केली जाईल. यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडून मंजुरी दिली जाणार आहे,’ असे आयुक्त राम यांनी सांगितले.

महापालिकेने यापूर्वी राबविलेल्या ‘अभय याेजने’त एकूण १ लाख ४० हजार ४३७ मिळकतदारांना सवलत दिली गेली. त्यांना यावेळी वगळले जाणार आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसाठी देखील ही योजना लागू राहणार आहे.

दंडाच्या रक्कमेत ७५ टक्के सवलत

थकबाकीदारांकडे एकूण १२ हजार १६१ काेटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिका थकबाकीवर दाेन टक्के इतका दंड घेते. प्रत्यक्षात या मिळकतदारांकडे ३ हजार १५८ काेटी रुपये इतकी थकबाकी आहे तर दंड सुमारे ९ हजार २ काेटी रुपये इतका आहे. ‘अभय याेजने’त मूळ मिळकतकरात काेणतीही सवलत दिली जाणार नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘सरसकट फायदा’

‘अभय योजने’चा फायदा घरगुती, व्यावसायिक अशा सर्व मिळकतदारांना होणार असून, दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत मिळणार आहे. दंडाची रक्कम कितीही असली, तरी त्यावर ही सवलत लागू असेल, असे आयुक्तांनी सांगितले.

महापालिकेची मिळकतदारांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करून त्यामधून ‘मिसिंग लिंक’ तसेच इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे मार्गी लागावीत, यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. महापालिकेने अभय याेजनेतून ५ हजार ४०८ काेटी रुपये इतका मिळकतकर वसूल करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका