पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा मागील सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपला यश देत असला, तरी महापालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे भाजपने ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य असलेल्या भागाला भाजपबहुल समाविष्ट गावांची हद्द जोडून दोन्ही ‘राष्ट्रवादी’ची कोंडी केली आहे. समाविष्ट गावांतील नवमतदारांवर भाजप अवलंबून आहे, तर ‘राष्ट्रवादी’ची गावांमधील पारंपरिक मतदारांवर मदार असणार आहे.

या मतदारसंघातील वारजे माळवाडी, धनकवडी-आंबेगाव पठार या भागात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ची ताकद आहे. मागील महापालिका निवडणुकीत वारजे माळवाडी या प्रभागात चारही तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. धनकवडी-आंबेेगाव पठारमध्ये चारपैकी तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. वडगाव धायरी- वडगाव बुद्रुक या प्रभागात चारही भाजपचे नगरसेवक होते. नव्याने समाविष्ट झालेल्या नऱ्हे या गावाच्या परिसराचा प्रभाग तयार करून २०१९ मध्ये निवडणूक घेण्यात आली. या भागात बहुतांश मतदार हे पुण्याबाहेरून स्थायिक झालेले आहेत. हा मतदार भाजपला साथ देणारा आहे. त्यामुळे भाजपच्या अश्विनी पोकळे या निवडून आल्या.

महापालिकेच्या हद्दीत २०१७ मध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये या विधानसभा मतदारसंघातील खडकवासला, नांदेड, नऱ्हे, आंबेगाव, किरकीटवाडी, नांदोशी, कोंढवे धावडे, जांभुळवाडी, उत्तमनगर ही गावे आहेत. पूर्वी या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची ताकद होती. मात्र, नव्याने विकसित झालेला हा परिसर आता भाजपबहुल झाला आहे. कामानिमित्त स्थलांतरित झालेले नागरिक हे या गावांमध्ये स्थायिक झाले आहेत. हे मतदार भाजपचे असल्याचे मानले जाते. त्यामुळे प्रभाग रचना करताना भाजपचा हा हक्काचा मतदार असलेला भाग ‘राष्ट्रवादी’चे मतदार असलेल्या भागाला जोडून भाजपने ‘राष्ट्रवादी’पुढे आव्हान उभे केले आहे. आता दोन ‘राष्ट्रवादी’मुळे या पक्षाची ताकदही विभागली गेली आहे. ही संधी साधून भाजपने प्रभाग रचनेद्वारे ‘राष्ट्रवादी’ला समाविष्ट गावांचा वेढा घातला आहे.

पूर्वीच्या वारजे माळवाडी या प्रभागाला आता वारजे- पाॅप्युलरनगर असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी माजी सभागृह नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे आणि सचिन दोडके निवडून आले होते. दोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे आहेत. धुमाळ आणि बराटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात आहेत. वांजळे यांचे बंधू मयूरेश वांजळे यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविली. अशा राजकीय परिस्थितीत मतदार कोणाला साथ देणार, हे औत्सुक्याचे असणार आहे.

मागील निवडणुकीत वडगाव धायरी- वडगाव बुद्रूक या प्रभागात चारही भाजपचे नगरसेवक निवडून आले. नवीन रचनेत वडगाव बुद्रूकला नऱ्हे जोडले आहे. वडगाव बुद्रूक आणि धायरी या दोन्ही गावांतील काही भाग या प्रभागात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने हा प्रभाग आणखी सुरक्षित झाला आहे.

शिवणे-खडकवासला हा नव्याने प्रभाग तयार झाला आहे. त्यामध्ये खडकवासला, सणसनगर, नांदोशी, किरकीटवाडी, कोंढवे धावडे, कोपरे गाव, नांदेड, शिवणे, उत्तमनगर ही गावे आहेत. या गावांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक मतदार असले, तरी डी. एस. के. विश्व, नांदेड सिटी या परिसराचा या प्रभागात समावेश करण्यात आल्याने भाजपसाठी हा प्रभागही सोपा करण्यात आला आहे.

धनकवडी – आंबेगाव पठार या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्या ठिकाणी वर्षा तापकीर या भाजपच्या एकच नगरसेविका निवडून आल्या होत्या. माजी नगरसेवक विशाल तांबे यांचा या भागात लोकसंपर्क आहे. या प्रभागाची रचना करताना धनकवडी- कात्रज डेअरी आणि आंबेगाव – कात्रज अशा दोन प्रभागांंमध्ये विभागणी करून ‘राष्ट्रवादी’च्या मतांची दुफळी करून भाजपने हे दोन्ही प्रभाग सोयीचे केल्याची चर्चा आहे.

समाविष्ट गावांतील नवमतदार आणि गावांमधील ‘राष्ट्रवादी’चे पारंपरिक मतदार हे कोणाला साथ देणार, यावर या प्रभागातील निकाल अवलंबून आहे.

दृष्टिक्षेप प्रभाग – प्रभागाचे नाव

  • ३२ – वारजे – पॉप्युलरनगर
  • ३३ शिवणे- खडकवासला
  • ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रूक
  • ३७ – धनकवडी – कात्रज डेअरी
  • ३८ आंबेगाव – कात्रज