पुणे : अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित ‘अभिजात मराठी शब्दोत्सव’ या प्रदर्शनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी संवाद साधला. ‘राजहंस’चे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, ‘अक्षरधारा’च्या रसिका राठिवडेकर, स्नेहा अवसरीकर या वेळी उपस्थित होत्या.

पाटील म्हणाले, ‘मजरूह सुलतानपुरी यांनी १९५० मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करणारी कविता लिहिली. नेहरूंची माफी मागून त्यांना त्रासापासून बचाव करता आला असता. मात्र, त्यांनी कोणतीही तडजोड न करता शब्दांशी प्रामाणिक राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली होती.’

‘‘महानायक’ कादंबरी लिहित असताना म्यानमारमधील परिस्थिती अतिशय नाजूक होती. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून सुभाषश्चंद्र बोस यांचा प्रवास जाणून घेताना अनेक कठीण प्रसंगांना मला सामोरे जावे लागले. तिथला मिलीटरी रूल अतिशय कडक असल्याने एक-दोन वेळा त्या नियमांमध्ये अडकता अडकता थोडक्यात बचावलो,’ अशी आठवण सांगून पाटील म्हणाले,‘झपाटलेपण आल्याशिवाय लेखकाला त्या विषयाला न्याय देता नाही.’

‘पानिपत’वर आरोप झाले पण…

‘मला इतिहासावर कादंबरी लिहायची नव्हती. मात्र, पानिपतवर कोणीही प्रभावी ग्रंथ लिहिला नव्हता. मराठीतील काही लेखक संशोधनात अडकले आहेत. तर काही ललित लेखनात. माझ्यावर ‘पानिपत’मधील घटना काल्पनिक असल्याचे आरोप झाले. मात्र, मराठ्यांचा इतिहास अत्यंत भव्य आहे. त्या इतिहासाचा खोलवर अभ्यास केल्यामुळे बऱ्याच गोष्टी समजल्या. लिहिता आल्या,’ असे विश्वास पाटील यांनी नमूद केले.

‘तोंडपूजक मित्र, प्रकाशक नको’

‘स्तुतीपाठक किंवा तोंडपूजक मित्र आजुबाजूला ठेवण्यापेक्षा वेळ प्रसंगी कान पकडणारे आणि तुमच्याकडून अधिकची अपेक्षा करणारे वाचक आणि प्रकाशक तुमच्या आजुबाजूला असणे आवश्यक असते. माझी अशीच एक गाजलेली कादंबरी राजहंस प्रकाशनाकडे प्रकाशनासाठी दिली असता त्यांचे संपादकीय मंडळ नाराज असल्याचे लक्षात येत होते. कारण ती कादंबरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कागदावर उतरली नव्हती. मी माजगावकरांकडून अधिकचा सहा महिन्यांचा कालावधी मागून घेतला आणि त्या कादंबरीला अंतिम रूप दिले. शेवटच्या क्षणीसुद्धा तुम्हाला पुनर्विचार करावा लागू शकतो. कारण लेखन ही एक प्रक्रीया असून पूनर्लेखन हे खरे लेखन असते,’ असे विश्वास पाटील म्हणाले.

‘दबावाला बळी न पडता लिहा’

‘लेखकाने कोणत्याही दबावाला बळी न पडता मुक्तपणे लेखन करायला हवे. पुनर्लेखनाची तयारी ठेवायला हवी. त्यासाठी लेखनावर टीका करणारे वाचक आणि संपादक आजूबाजूला असणे गरजेचे असते,’ असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

‘मराठी मासिकांची परंपरा संपत आहे. नव्या लेखकांना मार्गदर्शनाचे व्यासपीठ कमी झाले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचा स्वतंत्र मार्ग शोधायला हवा. शेवटी, मनापासून लेखन करा,’ असा सल्लाही त्यांनी नवोदित लेखकांना दिला. मुग्धा मिरजकर यांनी सूत्रसंचालन केले.