शहरातील प्रत्येक घटकाला काही ना काही लाभ देण्यासाठी सुमारे शंभर योजनांचा समावेश असलेले ४,१५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी मंगळवारी मुख्य सभेला सादर केले. अंदाजपत्रकात योजनांची खैरात करण्यात आली असली, तरी त्या अमलात आणण्यासाठी निधी कोठून आणणार हा प्रश्न मात्र कायम आहे.
आगामी आर्थिक वर्षांचे (२०१४-१५) अंदाजपत्रक गेल्या महिन्यात तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनी स्थायी समितीला सादर केले होते. त्यात अनेक बदल करून तसेच अनेक नव्या योजनांचा समावेश करून समितीचे अंदाजपत्रक मंगळवारी महापौर चंचला कोद्रे यांना सादर करण्यात आले. मुख्य सभेत चर्चा होऊन या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.
पुणे टूरिस्ट हब
अंदाजपत्रकात विविध समाजघटक लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काही ना काही घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘सर्वासाठी काही ना काही’ असे या अंदाजपत्रकाचे स्वरुप आहे. पर्यटकांना आकर्षित करून घेतील अशी अनेक ठिकाणे पुण्यात असल्यामुळे ‘पुणे टूरिस्ट हब’ करण्याची योजना अंदाजपत्रकात मांडण्यात आली असून या योजनेअंतर्गत अन्य बारा योजना प्रस्तावित आहेत. महागडय़ा औषधांमुळे रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन ‘जेनरिक मेडिसिन स्टोअर’ सुरू करण्याचीही घोषणा अंदाजपत्रकातून करण्यात आली असून महापालिकेच्या सात रुग्णालयांमध्ये ही व्यवस्था असेल. त्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात परिचारिका महाविद्यालय तसेच वैद्यकीय पदव्युत्तर केंद्र सुरू करण्याचीही घोषणा करण्यात आली असून त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
उड्डाणपूल, मेट्रो, मोनो रेल
कात्रज चौकातील उड्डाणपुलासह वडगाव ते कर्वेनगर, संतोष हॉल-सिंहगड रस्ता, मांजरी फाटा, वेधशाळा चौक आणि नगर रस्ता येथे ग्रेड सेपरेटर बांधण्याची योजना वाहतूक सुधारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याबरोबरच मेट्रो प्रकल्प, मध्य पुण्यातील रिंग रोड, मोनो रेल, पीएमपी सक्षमीकरण यासाठीही तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात महिलांसाठीही स्वसंरक्षण प्रशिक्षण, सबलीकरण, बचत गटांसाठी सभागृह, बचत गटासांठी बचत बाजार या योजनांसह अन्यही अनेक योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. गरवारे बालभवनच्या धर्तीवर शहराच्या उपनगरात देखील बालभवने उभी करण्यासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे.महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या चौतीस गावांसाठीही वीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
विविध योजना दृष्टिक्षेपात..
महापालिका भवनाचा विस्तार करणार
श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी भुयारी मार्ग
बालभवनच्या धर्तीवर उपनगरातही बालभवने
घोले रस्ता येथे मुलींसाठी वसतिगृहाची बांधणी
ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा स्पर्धा
पेशवे उद्यानात लेझर शो, सिंहगड रस्त्यावर कलाग्राम
दर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात ‘रेव्हेन्यू डे’
खासगी तत्त्वावर शंभर टनांचे कचरा प्रक्रिया प्रकल्प
शहरातील सर्व घटकांना डोळ्यापुढे ठेवून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. पुणेकरांमध्ये विश्वास निर्माण करून त्यातून शहराचा विकास करणे हे ध्येय आहे.
विशाल तांबे
अध्यक्ष, स्थायी समिती