ट्रॅफिक सिग्नलवर किंवा घरगुती समारंभात तृतीयपंथीयांकडून पैसे मागण्याचे प्रकार नवे नाहीत. पण कधी कधी तृतीयपंथीयांकडून पैसे मागण्यासाठी बळजबरी करण्यात येते. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तृतीयपंथी वाद घालतात. ट्रॅफिक सिग्नलवर वाद घातल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तृतीयपंथीयांची ही मनमानी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला असून बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर फौजदारी संहिता प्रक्रियेच्या कलम १४४ नुसार कारवाई केली जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी यासंबंधीचे संकेत दिले.

दिवसा डिलीव्हरी बॉय, रात्री सायबर क्रिमिनल; कोट्यवधीची फसवणूक करणारे आरोपी जेरबंद

ट्रॅफिक सिग्नल आणि सार्वजनिक व घरगुती समारंभात आमंत्रणाशिवाय घुसखोरी करून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले आहे. अमितेश कुमार नागपूर शहराचे आयुक्त असताना त्यांनी अशाच प्रकारचे आदेश यापूर्वी दिले होते. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि दंडाधिकारी अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक उपद्रव रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याचे आदेश देता येतात.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, तृतीयपंथींच्या छळवणुकीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याप्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले की, आमच्या निदर्शनास आल्यानुसार काही लोकांचे गट आणि विशेषतः तृतीयपंथी लग्न, इतर धार्मिक समारंभ, कुटुंबातील जन्म, मृत्यू यांसारख्या प्रसंगी एकट्याने किंवा एकत्रितपणे लोकांच्या घरी जमतात आणि जबरदस्तीने पैशांची मागमी करतात. पैसे न दिल्यास अश्लील आणि धमकावणारे वर्तन करतात. लोक स्वेच्छेने देत असल्यापेक्षा जास्त पैसे मागितले जातात, असे निदर्शनास आले आहे. बेकायदेशीरपणे एकत्र येणे, खंडणी वसूल करणे, सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे इत्यादी गुन्ह्यांसह आयपीसीच्या विविध कलमांखाली दंडनीय गुन्हा असले तरी अशा घटकांच्या भीतीमुळे अनेक लोक तक्रार करण्यासाठी पुढे येऊ शकत नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या उपद्रवी आणि जनतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांना रोखण्याच्या दृष्टीकोनातून सदर आदेश देण्यात येत आहेत.