Sextortion in Pune २८ सप्टेंबर २०२२ या दिवशी १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. पुण्यातल्या दत्तवाडी या ठिकाणी असलेल्या त्याच्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला. तयानंतर दोन दिवसांतच ३० सप्टेंबर २०२२ च्या दिवशी एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याचं आयुष्य संपवलं. धनकवडीतल्या तानाजी नगर भागात ही घटना घडली. या दोन्ही आत्महत्यांमागे सेक्सॉटर्शन असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

दत्तवाडी येथील घटनेबाबत काय माहिती समजली?

दत्तवाडी येथील १९ वर्षीय मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या बहिणीने सांगितलं की, या तरुणाने आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधी तिला मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरुन हॅलो असा मेसेज आला. तसंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो आला होता. या फोटोत तिचा भाऊ नग्न अवस्थेत बसला आहे हे दिसत होतं. युवकाच्या बहिणीने तो फोटो पाहिला आहे याची खात्री पटल्यानंतर अनोळखी सेंडरने तो फोटो डिलिट केला. यानंतर या मुलाच्या बहिणीने सांगितलं की तिला एका मुलीचा फोन आला. मी तुझ्या भावाची मैत्रीण बोलत असल्याचं त्या मुलीने सांगितलं. तसंच तिने या मुलाच्या बहिणीला असंही सांगितलं की कुणीतरी तुझ्या भावाला ब्लॅकमेल करतं आहे. यानंतर बहिणीने भावाला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. तिला तिच्या भावाची चिंता वाटू लागली. त्यामुळे भाऊ घरी आला आहे का? हे पाहण्यासाठी ती घरी आली. तो दिवस २८ सप्टेंबर २०२२ चाच होता. बहीण घरी आल्यानंतर तिने भावाला मृतावस्थेत पाहिलं. त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या बहिणीने पोलिसांना दिली.

कसून चौकशी केल्यावर पोलिसांना काय समजलं?

या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना समजलं की या मुलाशी प्रीती नाव धारण करुन महिला चॅटिंग करत होती. त्याला आपल्या जाळ्यात ओढून तिने या मुलाचे नग्न फोटो आणि व्हिडीओ मिळवले. त्यानंतर तू जर पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. यानंतर या मुलाने ब्लॅकमेलरला तीनवेळा प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये फोनवरील पेमेंट अॅपवरुन दिले. मात्र ब्लॅकमेलरकडून पैशांची आणखी मागणी होऊ लागली. तसंच या मुलाचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. ज्यानंतर या मुलाने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाची तांत्रिक बाजू आणि पेमेंट मिळवण्यासाठी वापरलेली पद्धत हे सगळं पाहिल्यानंतर पोलिसांना समजलं की या प्रकरणात राजस्थानातील गोथ्री गुरु गावातील एक २९ वर्षीय माणूस आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये पोलिसांनी या तरुणाला अटक केली. ऑनलाइन सेक्सॉटर्शनचं कलम त्याच्या विरोधात लावण्यात आलं. गुन्हा नोंदही करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु आहे.

धनकवडी आत्महत्या प्रकरणात काय काय समोर आलं?

धनकवडी या ठिकाणी जी आत्महत्येची घटना घडली त्यामागेही असाच प्रकार असावा असा अंदाज पोलिसांना वाटत होता. जो खरा ठरला. ज्या २२ वर्षीय तरुणाने २०२२ मध्ये आत्महत्या केली, त्याच्या मोबाइल Whats App मध्ये पोलिसांना तो एका महिलेशी चॅटिंग करत असल्याचं समजलं. २२ वर्षीय तरुण आणि महिला यांच्यात चॅटिंग, व्हिडीओ कॉल सगळं झाल्याचं समजलं. ३० सप्टेंबरला म्हणजेच या मुलाने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशीही या दोघांमध्ये सुमारे अडीच तास व्हिडीओ कॉल झाला होता. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने या तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडीओ शूट केले. त्यानंतर पैसे दे अन्यथा ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन असं म्हणत ब्लॅकमेलिंग सुरु केलं. या तरुणाने सुरुवातीला ४ हजार ५०० रुपये ब्लॅकमेलरला दिले. पण या तरुणाचं ब्लॅकमेलिंग सुरुच होतं. या तरुणाने त्या ब्लॅकमेलरला हेदेखील सांगितलं की मी आत्महत्या करेन त्यावर हा ब्लॅकमेलर म्हणाला हो कर आत्महत्या मी तुला व्हिडीओ कॉल करतो. या सगळ्या तणावातून २२ वर्षीय मुलाने ३० सप्टेंबर २०२२ ला आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणातल्या आरोपीलाही राजस्थानमधूनच अटक करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आली तो मुलगाही २२ वर्षांचाच आहे. पोलिसांनी सांगितलं अनेक तरुणांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्याचे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.

२०२३ मध्ये आमदाराचंही सेस्कॉटर्शन

२०२३ मध्ये पोलिसांनी आणखी एका २४ वर्षांच्या तरुणाला अटक केली. हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराच्या सेक्सॉटर्शनमध्ये गुंतला होता. त्यानेही या आमदाराला फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय?

सेक्सटॉर्शन हा एक सायबर गुन्हा- सायबर फसवणूक आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात आपण सहजच एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संभाषण ‘चॅटिंग’च्या माध्यमातून सुरु करतो, ओळख वाढते, मोबाईल नंबर्सची देवाणघेवाण होते, त्या व्यक्ती सोबत व्हिडीओ कॉल सुरू होतात आणि याचीच परिणती ‘प्रेम, आकर्षण, वासना’ यांसारख्या भावनांमध्ये होते. आणि अखेरीस त्यातूनच न्यूड- नग्न प्रतिमांची अदलाबदल, किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या सगळ्याचे प्रदर्शन होते. बऱ्याच वेळा नग्नता नसली तरी केवळ कॉलच्या माध्यमातून रेकॉड झालेल्या प्रतिमांना तसे स्वरूप दिले जाते. एकदा का आरोपीचे काम झाले की, खंडणीसाठी कॉल येतात. तुम्ही ठरलेली खंडणी दिली नाही तर तुमच्या अश्लील, नग्न प्रतिमा, चित्रफिती प्रसारमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. या प्रकरणांमध्ये केवळ पुरुषच नाही तर महिला पीडितांची संख्याही वाढते आहे.

सेक्सटोर्शन कसे केले जाते?

आरोपी ज्या व्यक्तीला फसवायचे आहे, त्या व्यक्तीशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. प्रसार माध्यमांवर अनेकदा मैत्रीसाठी विनंती वारंवार केली जाते. मुख्यतः तरुणवयीन त्याचप्रमाणे किशोरवयीन मुले त्यांचे लक्ष्य असतात. असे असले तरी गेल्या दोन वर्षांत असे लक्षात आले आहे की, मध्यमवयीनांची संख्याही तेवढीच वाढते आहे, परंतु या वयोगटातील लोकांकडून लोकलज्जेस्तव त्या गुन्ह्यांची तक्रार करणे टाळले जाते. दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार यामध्ये अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. तर आजपर्यंत झालेल्या एकूणच गुन्ह्यांचे स्वरूप पाहता अल्पवयीन मुलांबरोबरीनेच वय वर्षे ४० च्या आसपास असलेल्या मध्यमवयीन पुरुषांचा समावेशही पीडितांमध्ये अधिक आहे. कोण किती खंडणी देवू शकेल आणि त्यानंतर वाच्यता कोण करणार नाही, याचाही विचार आरोपींनी गुन्हा घडताना केलेला असतो, असे अनेक तपासांमध्ये लक्षात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय खबरदारी घ्याल?

प्रत्यक्षात परिचयाच्या नसलेल्या कोणाचीही ऑनलाइन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, असा सल्ला सायबरतज्ज्ञ नेहमीच देतात. कोणत्याही अनोळखी व्यक्ती बरोबर ईमेल किंवा सोशल मीडिया हँडल्स शेअर करू नका. तुम्ही ओळखत नसलेल्या व्यक्तीने तुमची वैयक्तिक माहिती विचारली तर ‘नाही’ म्हणा. तुमचा पासवर्ड कधीही कोणाशीही शेअर करू नका. पाळीव प्राण्यांची नावे, जन्मतारीख इत्यादी अंदाज लावण्याइतके सोपे पासवर्ड वापरू नका. तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांकडून आलेल्या ई-मेलमधील लिंकवर क्लिक करू नका; असे केल्याने हॅकर्स तुमच्या उपकरणाशी जोडला जावू शकतो.