अभिनेत्री संगीता बिजलानीच्या बंगल्याची तोडफोड करण्यात आली आणि चोरीही करण्यात आली. मात्र तीन महिने उलटूनही या प्रकरणात चोरी कुणी केली किंवा नेमकं पुढे काय झालं याचा सुगावा लागलेला नाही. अभिनेत्री संगीता बिजलानीने पुणे ग्रामीणचे चे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची भेट घेतली आणि प्रकरणाची माहिती घेतली.

जुलै महिन्यात नेमकी घटना काय घडली होती?

जुलै महिन्यात संगीता बिजलानीच्या मावळ येथील तिकोणा या भागात असलेल्या बंगल्यात चोरी झाली होती. तसंच तोडफोडही करण्यात आली होती. १९ जुलैला ही घटना घडली. कुणीतरी संगीता बिजलानीच्या बंगल्यात शिरून तोडफोड केली. त्यानंतर आक्षेपार्ह मजकूर स्लायडिंगच्या काचेच्या दारावर लिहिला होता. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक झालेली नाही. घडलेल्या प्रकरणाला तीन महिने झाले आहेत. संगीता बिजलानीचा पती आणि माजी क्रिकेटर अझरुद्दीनला जेव्हा घडला प्रकार कळला तेव्हा त्याने त्याचा सचिव मोहम्मद मुजीब खानला या प्रकरणी फोन केला. ज्यानंतर खानने १९ जुलै २०२५ ला या प्रकरणात FIR दाखल केली.

FIR मध्ये काय म्हटलं आहे?

FIR मधील माहितीनुसार १८ जुलैला संगीता बिजलानीच्या तिकोणा मावळ येथील बंगल्यात चोरी आणि तोडफोड झाली. ही सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी संगीता बिजलानीला समजली. दरम्यान खान याला संगीता बिजलानी यांनी काय घडलं आहे ते सांगितलं. संगीता बिजलानी म्हणाल्या की त्या जेव्हा बंगल्यात गेल्या तेव्हा घरातलं फर्निचर, किचनमधल्या काही वस्तू बेडरुममधल्या काही वस्तू चोरीला गेल्या होत्या. घरातून सात हजार रुपये किंमतीचा एक जुना टीव्ही वडिलांच्या खोलीत ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड हे सगळं चोरीला गेलं. तर दुसरा एक टीव्ही फोडण्यात आला. तसंच काचेवर आक्षेपार्ह शब्द लिहिण्यात आले होते.

चोरीच्या प्रकरणाची चौकशी सुरु

१८ जुलै ते आजपर्यंत या चोरीच्या घटनेची चौकशी केली जाते आहे. संगीता बिजलानीने या प्रकरणात रितसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात कलम ३३१, ३३१ (४), ३०५ (अ), ३२४ (५) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटे बंगल्यात भिंतीचा काही भाग तोडून घुसले होते. तसंच बंगल्याच्या ग्रील तोडून हे सगळे चोरटे बंगल्यात शिरले आणि त्यांनी चोरी करुन नंतर पुन्हा त्याच मार्गाने पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगल्याला वॉचमन नाही, तसंच या ठिकाणी कुणी सुरक्षा रक्षकही नव्हता. बंगल्यामध्ये ७ मार्च २०२५ रोजी संगीता बिजलानी आली होती. संगीता बिजलानी गेल्यानंतर काही दिवसांनी आणि १८ जुलैच्या दरम्यान ही चोरी झाली आहे असं पोलीस म्हणाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

हिस्ट्री शिटर्सशी जुळून आले चोरट्याचे ठसे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक टीमला या ठिकाणी दोन संशयित ठसे आढळून आले आहेत. हे ठसे हिस्ट्री शिटर्सशी जुळून आले आहेत असंही पोलिसांनी सांगितलं. मात्र आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज आढळून आलेलं नाही. त्यामुळे या चोरट्यांचा तपास सुरु आहे. या आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही असं लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीनेश तायडे यांनी सांगितलं.