पुणे : वानवडी भागात हवाई दलातून निवृत्त झालेल्या निवृत्त अधिकाऱ्याच्या बंगल्यात चोरट्यांनी दरोडा घातला. निवृत्त अधिकारी, तसेच त्यांच्या पत्नीला धमकावून चोरट्यांनी सोन्याचे हिरेजडीत ८३ तोळे दागिने, साडेसात लाख रुपये असा ५९ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
याबाबत हवाई दलातून निवृत्त झालेल्या ८७ वर्षीय अधिकाऱ्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अधिकारी हवाई दलात विंग कमांडर होते. १९९२ मध्ये ते हवाई दलातून निवृत्त झाले.
वानवडी गावात त्यांचा बंगला आहे. पत्नी, मुलगा, सून बंगल्यात राहायला आहेत. अधिकाऱ्याच्या मुलाचा वानवडी भागात मोटार, जीप सजावटीचा (कार डेकाॅर) व्यवसाय आहे. बंगल्यातील तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर दोन शयनगृह आहे. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे रात्री अकराच्या सुमारास शयनगृहात झोपायला गेले. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरटे बंगल्यात शिरले. चोरटे शिरल्याने आवाज झाला. निवृत्त अधिकारी झोपेतून जागे झाले.
त्यांनी कानाला यंत्र लावले. त्या वेळी दोन चोरटे शयनगृहात शिरले होते. त्यंनी चेहरा कापडाने झाकला होता. अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला धमकावून चोरट्यांनी कपाटाची चावी मागितली. दोघांचे मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून घेतले. आरडओरडा केल्यास जिवे मारू, अशी धमकी चोरट्यंनी त्यांना दिली. चोरट्यांनी कपाट उघडले.
कपाटातील दागिने, रोकड असा ऐवज चोरट्यांनी काढून घेतला. त्यानंतर चोरटे अंधारात पसार झाले. या घटनेनंतर त्यांनी पहिल्या मजल्यावर झोपेत असलेल्या मुलगा आणि सुनेला जागे करून या घटनेची महिती दिली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.
सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरटे कैद
निवृत्त हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या बंगल्यात शिरलेले दोन चोरटे सीसीटीव्ही चित्रीकरणात कैद झाले आहेत. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत, असे पोलीस उपायु्कत डाॅ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.