पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका युवकावर कोयत्याने डोक्यात, पाठीवर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर मुलांनी इतक्या जोरात वार केला की युवकाचा पंजा मनगटापासून तुटून वेगळा झाला. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील प्लाॅट क्रमांक ११ येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाबाहेर बुधवारी (२ जुलै) दुपारी हा प्रकार घडला.

अभिषेक गणेश दोरास्वामी (वय १७, रा. हडपसर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील गणेश राजन दोरास्वामी (वय ४६, रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्लॉट नंबर ११ येथे रहायला आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक याची पूर्वी गल्लीतील मुलांबरोबर भांडणे झाली होती. त्यामुळे त्यांनी अभिषेक याला हडपसर येथे राहायला ठेवले आहे. अभिषेक हा आपल्या आई-वडिलांकडे आला होता. तो सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये गेल्याचे तिघा अल्पवयीन मुलांनी पाहिले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हे तिघे बाहेर दबा धरुन बसले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेक बाहेर येताच त्याच्या डोक्यावर, पाठीवर, डावे हातावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यांनी डाव्या हातावर इतका जोरात वार केला  की त्याचा पंजा मनगटापासून वेगळा झाला. अभिषेक याच्यावर खासगी रुग्णालयाक उपचार करण्यात येत आहेत.  पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पुढील तपास करीत आहेत.