पुणे : अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे मंगळवारी (२ सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपींकडून मेफेड्रोन खरेदी करण्यासाठी गेले होते. रास्ता पेठेतील सिटी चर्चसमोर आरोपींनी त्यांना भेटायला बोलाविले होते. आरोपींनी पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर मेफेड्रोन दिले नाही. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी तिघांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.