पाच वर्षांपूर्वी चंदननगरमधील महानगर को-ऑप बँकेत सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवून तीस जणांनी दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे पुढे निष्पन्न झाले आणि बँकेचीही फसवणूक झाली. या गुन्ह्य़ात बँकेतील मूल्यांकनकार (व्हॅल्युअर) आणि एकाचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यास सुरुवात झाली. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी बँकेचा मूल्यांकनकार चक्क साधूच्या वेशात फिरू लागला होता. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर राहणारा भामटा साधूच्या वेशात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनीही मग साधुवेशात वावरणाऱ्या भामटय़ाला पकडण्यासाठी चक्क साधूचा वेश धारण केला आणि एक दिवस रात्रभर त्याच्या घराजवळ सापळा लावून पोलिसांनी त्याला पकडले.
चंदननगर भागात नुकतीच ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना वेगवेगळ्या पातळीवर तपास करावा लागतो. अर्थात तपासात खबऱ्यांचे (इन्फॉर्मर) जाळे उपयुक्त ठरते. काही गुन्ह्य़ांच्या तपासात पोलिसांना वेशदेखील बदलावा लागतो. रस्त्यावरचा फेरीवाला, भिक्षेकरी किंवा धनाढय़ व्यक्तीसारखी वेशभूषा करावी लागते. वेशांतर करून साधुवेश धारण करून वावरणाऱ्या आणि बँकेच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला कसे पकडले, याबाबतची माहिती देताना चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर म्हणाले की, सन २०१० मध्ये महानगर को-ऑप बँकेतील मूल्यांकनकार संतोष मैड (वय ४२) याने साथीदार हनुमंत पाटील याच्याशी संगनमत केले. त्यांनी तीस जणांना बनावट सोने तारण ठेवून बँकेकडून क र्ज घेण्यास सांगितले. त्यापोटी त्यांना काही रक्कम देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. बँकेने मैड याला सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्यास सांगितले. तीस कर्जदारांनी तारण ठेवलेले हे सोने हे खरे असल्याचा अभिप्राय मैडने बँकेला दिला होता. त्यानंतर बँकेने तीस जणांना एकूण दोन कोटी अकरा लाख रुपयांचे कर्ज दिले.
दरम्यान, दहा वर्ष बँकेकडे मूल्यांकनकार म्हणून काम करणाऱ्या मैड याचा कार्यकाळ संपल्याने बँकेने दुसऱ्या एका मूल्यांकनकाराची नेमणूक केली. त्याने पूर्वी तारण ठेवलेल्या सोन्याची पडताळणी केली तेव्हा ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकेकडून गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज दिल्यानंतर पोलिसांनी हनुमंत पाटील आणि मैड यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोघांनी कर्जाची परतफेड करतो, असे बँकेला सांगितले. काही जुजबी रक्कम त्यांनी भरली आणि त्यानंतर टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे महानगर बँकेचे वसुली अधिकारी गंगाधर खेसे यांनी गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०१५ रोजी चंदननगर पोलीस ठाण्यात मैड आणि पाटीलविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्याची बातमी मैडच्या वाचनात आली आणि तो पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, पाटील आणि मैडने न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने त्यांचे जामीनअर्ज फेटाळून लावले. पसार झालेल्या मैड आणि पाटील यांना पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.
मैड साधुवेशात वावरत आहे. तो गाणगापूर आणि गोंदवले येथील मठात राहत आहे. भगवी कफनी धारण करून तो चंदननगर भाजी मंडईनजीक असलेल्या घरी कुटुंबीयांना भेटण्यासाठी येतो, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरात सापळा लावला.
मैड त्याच्या घरी साधुवेश धारण क रून आल्याची माहिती ११ डिसेंबर रोजी पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील निगुडकर, उपनिरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार एस. बी. तळेकर, हवालदार व्ही.एम. भोसले, अजित धुमाळ, हेमंत झुरुंगे, प्रशांत माटे, अमोल गायकवाड, शैलेंद्र साठे यांनीही मग साधुवेश धारण करून तेथे पाळत ठेवली. मैडच्या पाठोपाठ पोलिसांचे साधूच्या वेशातील पथक त्याच्या घरात शिरले. ‘गाणगापूरहून आलो आहोत. महाराजांना भेटायचे आहे’, अशी बतावणी साधुवेशातील पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांकडे केली. त्यानंतर मैड लगेचच बाहेर आला. पोलिसांनी त्याला पकडले. सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेणाऱ्या मैडला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. त्यानंतर त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली, असे पोलीस निरीक्षक पाथ्रुडकर यांनी सांगितले.
साधुवेशात वावरणाऱ्या बँकेच्या मूल्यांकनकाराच्या अटकेनंतर गेले वर्षभर संथगतीने चाललेल्या तपासाला गती मिळाली आहे. आतापर्यंत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकोणीस जणांना अटक केली. या गुन्ह्य़ातील पसार आरोपी पाटीलचा शोध सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी मैडने रूपी बँकेकडून काही क र्ज घेतले होते. हे क र्ज थकल्यानंतर त्याने पाटीलशी संगनमत केले. रविवार पेठेतील बोहरी आळी भागातून त्याने क र्जदारांना बनावट सोन्याचे दागिने आणून दिले होते. हेच बनावट सोन्याचे दागिने कर्जप्रकरणासाठी तारण ठेवण्यात आले होते.