पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, कोथरूडमध्ये बंद सदनिका फोडून चोरट्यांनी तब्बल १७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली आहे. टेहाळणी करून चोरट्यांनी ही घरफोडी केल्याचा संशय आहे. काहीच दिवसांपूर्वी सोसायटीत शिरलेल्या दोन चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर पिस्तूल दाखवत पोलिसांना आव्हान दिले होते. पण, पोलिसांनी ते लायटर असल्याचा दावा केला होता. मात्र, ते लायटर नव्हे तर पिस्तूलच असल्याचेही आता समोर आले आहे.

याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या पौड रोडवरील वनाज परिवार सोसायटीत राहण्यास आहेत. २९ सप्टेंबर रोजी त्या घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल्या होत्या. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप बनावट किल्लीने उघडून आत प्रवेश केला. नंतर त्यांच्या शयनगृहामध्ये कपाटात ठेवण्यात आलेले सोन्या-चांदीचे दागिने असा १७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार या ७ ऑक्टोंबर रोजी परत आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून या भागातील सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढला जात आहे.

कोथरूडकर भीतीच्या छायेत

कोथरूडसारख्या भागात सातत्याने घरे फोडली जात आहेत. गेल्या आठवड्यात चोरट्यांकडून चोरीच्या प्रयत्नानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर दाखविण्यात आलेले पिस्तुलाची घटना, नंतर घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आणि सतत होत असलेल्या घरफोडी यामुळे कोथरूडकर भीतीच्या छायेत आहेत. एके ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर पिस्तूल दाखविणाऱ्या चोरट्यांकडे लायटर होते, असा दावा करून पोलिसांनी प्रकरण शांत केले होते. वास्तविक, ते पिस्तूल असल्याचे आता सहा दिवसांनी समोर आले आहे.

उघड्या दरवाजातून दोन लाखांची चौरी

शुक्रवार पेठेतील भारत भवन या इमारतीमध्ये असलेल्या सांस्कृतिक वार्तापत्र या कार्यालयाचा दरवाजा उघडा असताना तेथे आलेल्या अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० ते २९ सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेने खडक पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.