पुणे : समाजमाध्यमावर ओळख वाढवून तरुणाला आपल्या घरी बोलावून घेत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडून नंतर बलात्काराची फिर्याद दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पावणेदोन लाख रुपये उकळले. पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्याने त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे कंधार आणि नांदेड येथील दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करणाऱ्या एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आंबेगाव येथील एका ३१ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती येथे राहणाऱ्या एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ नोव्हेंबर २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान या तरुणीच्या घरी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाशी मैत्री प्रस्थापित करून तरुणीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तरुणीने फिर्यादीकडून १ लाख १५ हजार ३६४ रुपये किमतीच्या वस्तू आणि ५७ हजार ३०० रुपये रोख असे एकूण १ लाख ७२ हजार ६६४ रुपये जबरदस्तीने घेतले. त्यानंतर तिने लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने तिने फिर्यादीविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारी रोजी बलात्कार आणि अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर चौकशी केल्यावर या तरुणीने अशाच प्रकारे २०१७ मध्ये नांदेड येथील एक तरुण आणि २०२२ मध्ये कंधार येथील एका तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळली, असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड पुढील तपास करीत आहेत.