पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत कर्वेनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेसह दोघांची एक कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत ६७ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कर्वेनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर जुलै महिन्यात संपर्क साधला. ‘तुमच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात अटक टाळायची असेल, तर तातडीने पैसे जमा करावे लागतील,’ अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली.

चोरट्यांनी भीती दाखविल्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ९७ लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी सारसबाग परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नेहरू स्टेडियम परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी

बँक खाते अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची दोन लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ६९ वर्षीय ज्येष्ठाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार दांडेकर पूल भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. बँक खात्यातील माहिती अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी खात्यातून दोन लाख ३० हजार रुपये लांबविले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत दोघांची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २२ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून १२ लाख दहा हजार रुपये घेतले. पैसे गुंतविल्यानंतर त्यांना परतावा, तसेच गुंतविलेली रक्कम परत केली नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत विमाननगर भागातील एका नागरिकाची दहा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करत आहेत.