पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारांचा विळखा वाढत चालला असून, महिला आणि अल्पवयीनांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्थेच्या (एनसीआरबी रिपोर्ट २०२३) अहवालावरून ही बाब उघडकीस आली आहे. या अहवालात २०२३ मध्ये घडलेल्या देशभरातील प्रमुख शहरातील गंभीर गु्न्ह्यांची संख्या, तुलनात्मक वाढ याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे.

पुण्यात २०२१ मध्ये ९ हजार ५११, तर २०२२ मध्ये ११ हजार ७४ गुन्हे दाखल झाले. २०२३ मध्ये १२ हजार ५४२ गु्न्हे दाखल झाले. २०२२ मध्ये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेता २०२३ मध्ये गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात १६.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये २३ टक्क्यांहून अधिक वाढ, तसेच अल्पवयीनांवर अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये ६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशभरात २०२३ मध्ये प्रमुख शहरांमध्ये ८६ हजार ४२० सायबर गुन्हे दाखल झाले. २०२२ च्या तुलनेत हे प्रमाण ३१.२ टक्क्यांनी वाढले आहे. २०२२ मध्ये ६५ हजार ८९३ गुन्हे दाखल झाले हाेते. पुणे शहरात सायबर गुन्हेगारांचा विळखा घट्ट होत चालला आहे. २०२१ मध्ये २२५, २०२२ मध्ये ३५७ आणि २०२३ मध्ये ४८७ सायबर गुन्हे दाखल झाले. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाचे आमिष (ऑनलाइन टास्क), शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, तसेच कारवाईची भीती दाखवून फसवणूक (डिजीटल ॲरेस्ट) करण्यात येत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोपपत्र दाखल होण्यात पुणे तिसऱ्या क्रमांकावर

पुणे पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यांचा तपास केल्यावर आरोपीविरुद्ध पुरावे संकलित करुन न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे. मुदतीत आरोपपत्र दाखल करण्यात पुणे पोलीस दल हे देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोची, कोलाकातानंतर पुणे पोलिसांकडून न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे ‘एनसीआरबी २०२३’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.