पुणे : पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर आला होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असण्याची शक्यता आहे. दूषित पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

पावसाच्या पाण्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते. हे पाणी पिल्यास अतिसार, थंडी, ताप यांसारखा त्रास होऊ शकतो. अशी लक्षणे दिसून आल्यास आशा सेविका, परिचारिका, आरोग्य सेवकांकडून त्वरित उपचार करून घ्यावेत. तसेच नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा. जुलाब आणि अतिसारात जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा जलसंजीवनीचा (साखर, मीठ, पाणी) वापर करावा. जुलाब, अतिसार, काविळची साथ असल्यास पिण्याच्या पाण्यात क्लोरीन लिक्विड टाकूनच प्यावे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड : IAS पूजा खेडकर प्रकरणातील ‘त्या’ कंपनीचा लवकरच लिलाव होणार?

नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी. नळ गळती, व्हॉल्व गळती असेल तर दुरुस्त करून टाकीभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. साठवणुकीचे पाणी झाकून ठेवावे आणि ५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवू नये. आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा. पिण्याच्या पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून धुवून, पुसून आणि कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळ्या पाण्यामधे होऊ देऊ नयेत. साथीचे आजार बळावल्यास महापालिकेच्या दवाखान्यांतील डॉक्टरांना दाखवावे, असेही आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

हेही वाचा – बनावट प्रमाणपत्राबाबत राज्यपालांची स्पष्ट भूमिका… म्हणाले, “घेणारे, देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात काय काळजी घ्यावी…

  • पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा.
  • पिण्याचे पाणी उकळून व गार करून झाकून ठेवावे.
  • वापरात नसलेल्या विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरू नये.
  • उघड्यावरचे अन्न व शिळे अन्न खाऊ नये.
  • शौचाहून आल्यानंतर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.