पुणे : भाजप कामगार आघाडीचा पुणे शहर अध्यक्ष ओंकार कदम आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकार्याचे चित्रीकरण करून दमदाटी केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यावर कारवाई करणार का असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.
त्याच दरम्यान पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी ओंकार कदम याच्यासह त्याच्या साथीदारांना पुणे महापालिका आणि याच्या संलग्न कार्यालयात प्रवेश बंदीचे आदेश काढले.
त्या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौर्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय घडामोडी बाबत भूमिका मांडली. त्यावेळी ओंकार कदम या भाजप पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकार्याला दमदाटी केल्याची घटना घडली आहे, त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होणार का ? प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, कुठल्याही पक्षाचा कोणीही असो, चुकीचा वागेल, कायदा मोडेल, तर या राज्यामध्ये आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असो आमच्या पक्षाचा असो की दुसर्या पक्षाचा असो कारवाई होणारच अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.