पुणे : धायरी गावातील उंबऱ्या गणपती चौकातील मद्यविक्रीच्या दोन दुकानांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात सातत्याने तक्रारी करूनही त्या दुकानांवर जुजबी कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ आणि ही दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, या मागणीसाठी धायरीकरांकडून येत्या सोमवारी (१ जून) गणपतीला साकडे घालण्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
धायरी गावातील उंबऱ्या गणपती चौकात मद्यविक्रीची दोन दुकाने आहेत. या दुकानांचा त्रास येथून मार्गक्रमण करणाऱ्या महिला, नागरिक आणि शाळकरी मुलांना होत आहे. मद्यविक्री दुकाने बंद असणाऱ्या दिवशीही (ड्राय डे) या दुकानांमधून अवैध मद्यविक्री केली जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
मद्यविक्रीची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने गणपतीची महाआरती करून साकडे घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती धनंजय बेनकर, नीलेश दमिष्टे, सनी रायकर आणि चिंतामणी पोकळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मद्यविक्रीची दुकाने कायमस्वरूपी बंद होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.