पुणे : प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करण्यात येणार असून, त्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथे आरोग्य यंत्रणेला केली.

आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उत्तम आरोग्य विषयक सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी तसेच उपचारांच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व साधनसामग्री, औषधसाठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने रुग्णालयांनी दक्ष राहवे. आरोग्य सेवा सक्षम ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे तालुक्याचा आढावा घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात पदभरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी सूचना डुडी यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण, रुग्णालय परिसराचे सुशोभीकरण, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड, आवश्यक सोयी सुविधा, साहित्य, औषधखरेदी आदी बाबींचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे पाठविण्यात यावा. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. ससून रुग्णालयात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीप्रमाणे ग्रामीण रुग्णालयांना सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल, असे डुडी यांनी स्पष्ट केले.