पुणे : राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात निरक्षरांचे वर्ग तात्काळ सूरू करावेत. त्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे. दुर्लक्ष करणारे शिक्षक आणि अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियामक परिषद रचना समितीच्या बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते.

जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) आणि नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सदस्य सचिव कमलाकांत म्हेत्रे, नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक नामदेव गवळी, शासकीय तंत्रनिकेतनचे विभाग प्रमुख वि. ग. तांबे, शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरवणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता एन .पी. शेंडकर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : अपघातात जप्त केलेले वाहन परत देण्यासाठी लाच; मंचरमधील सहायक निरीक्षकासह दोघांना अटक

देशात निरक्षरता ही एक प्रमुख सामाजिक समस्या असून तिच्या समूळ उच्चाटनासाठी १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींसाठी केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. तालुकास्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमात प्राधान्याने लक्ष घालून राज्यात जिल्ह्याची कामगिरी चांगली होईल, यादृष्टीने नियोजन करावे. शिक्षण संघटनांनी या कार्यक्रमावरील टाकलेला बहिष्कार तात्काळ मागे घेवून कार्यक्रमात सहभागी व्हावे, तसेच जिल्ह्याला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहनही डॉ. देशमुख यांनी केले.

हेही वाचा : जेवण केले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण करून खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या ‘उल्लास’ या उपयोजनावर निरक्षर व्यक्ती, स्वयंसेवक व्यक्ती आणि सर्वेक्षक यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यात वय वर्षे १५ वरील एकूण निरक्षर व्यक्ती १० लाख ६७ हजार ८२३ आहेत. त्यापैकी २०२२-२३ या दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यासाठी एकूण ६३ हजार ९५० निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून ५२५ व्यक्तींना साक्षर केल्याची नोंद झाल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.