पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नितीन नागनाथ अभिवंत (वय ४२, मूळ गाव देवडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांचे हिमालयातील ट्रेकिंगदरम्यान श्वासोच्छवासात अडथळा आल्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, आठ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
सोलापूर येथे पाच वर्षांच्या सेवेनंतर डॉ. अभिवंत २०१४ पासून ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागात कार्यरत होते. त्यांना गिर्यारोहणाची आवड होती. महाविद्यालयीन मित्रांसह ते शनिवारी मुंबईहून हिमालयातील बुरान व्हॅली येथे ट्रेकिंगसाठी गेले. सोमवारी सकाळी गिर्यारोहणास सुरुवात केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांना धाप लागून घाम फुटला. सोबत असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
डॉ. अभिवंत यांनी ससून रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज यशस्वीपणे सांभाळले. अनेक राष्ट्रीय उपक्रम, संशोधनात त्यांचा सहभाग असल्याची माहिती त्यांचे सहयोगी डॉ. नितीन थोरात यांनी दिली.