पुणे : बंगळुरुतील एका ९ वर्षीय मुलाला वारंवार अपस्माराचे झटके येत होते. अनेक औषधे घेऊनही त्याचे झटके थांबत नव्हते. त्याला औषध प्रतिरोधक बहुस्तरीय अपस्माराचे निदान झाले. यावर चेतासंस्थेच्या शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसल्याने त्याच्या पालकांनी पुणे गाठले. पुण्यातील डॉक्टरांनी या मुलावर व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशनची (व्हीएनएस) गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याने अखेर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून हा मुलगा औषध प्रतिरोधक बहुस्तरीय अपस्माराचा रुग्ण आहे. त्याला वारंवार अपस्माराचे झटके येत असल्याने त्याची वाचा, हालचाल आणि मेंदूचे कार्य यावर परिणाम झाला होता. यातून त्याला एपिलेप्टिक एन्सेफॅलोपॅथी हा गंभीर मेंदूविकार झाला. हा मुलगा नैसर्गिक वाढीचे महत्त्वाचे टप्पे गाठण्याबाबत मागे पडला होता. त्यामुळे त्याला बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. या मुलामध्ये अपस्माराचे झटके येण्याचे केंद्र मेंदूतील एकाहून जास्त ठिकाणी होते. हे निश्चित करण्यासाठी त्याचे व्हिडिओ ईईजी मॉनिटरिंग करण्यात आले. चेताविकारतज्ज्ञ डॉ. मुदस्सर यांनी मुलाच्या मेंदूच्या दोन्ही भागांत सातत्याने इलेक्ट्रिकल डिस्चार्ज होत असल्याच्या शक्यतेला पुष्टी दिली.

या प्रकरणात न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अमित धाकोजी यांनी व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशनचा (व्हीएनएस) पर्याय निवडण्याचे ठरवले. व्हीएनएसमध्ये एका वायरद्वारे एक लहानसे पल्स जनरेटर यंत्र मानेतील व्हेगस नसेशी जोडण्यात आले. ही नस आपल्या छातीच्या वरील डाव्या बाजूमध्ये स्थित असते. उपकरणातून येणारे विद्युत धक्के सौम्य असतात व ते पूर्वनिर्धारित अंतराने पाठवले जातात. यामुळे अपस्माराच्या झटक्यांची तीव्रता आणि ते वारंवार येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. या मुलाचे अपस्माराचे झटके आता कमी झाले असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.

व्हीएनएसमुळे अपस्मार हा विकार कायमस्वरूपी बरा होत नाही, मात्र त्यामुळे झटके येण्याचे प्रमाण आणि तीव्रता कमी होते. तसेच, नसांचे नुकसान कमी होते. शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांपर्यंत दर दोन आठवड्यांनी रुग्णामध्ये बसविलेल्या उपकरणाची सेटिंग बदलली जातात. तसेच, व्हीएनएस बॅटरी दर पाच वर्षांनी बदलावी लागते. – डॉ. अमित धाकोजी, न्यूरोसर्जन