पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे तसेच नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील फन टाइम थिएटर ते विठ्ठलवाडीदरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हे दोन्ही पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून, येत्या १५ ऑगस्ट रोजी पुलांचे उद्घाटन होण्याची शक्यता काहींनी बोलून दाखविली.

गणेशखिंड रस्त्याने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गाचे काम केले जात आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर आनंदऋषीजी चौकात दुमजली उड्डाणपूल उभारला जात आहे. या ठिकाणी असलेला उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आल्यानंतर ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या’ (पुम्टा) बैठकीत दुमजली पूल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

भूसंपादनाच्या काही अडचणी आल्याने हे काम पूर्ण होण्यास विलंब होत गेला. हे काम तातडीने पूर्ण करून जून २०२५ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अडचणी आल्याने या कामाला उशीर झाला. जुलै महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर तातडीने हा पूल वाहनचालकांसाठी खुला होईल, असा दावा केला जात होता. त्यानुसार आता या पुलाचे काम पुढील चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार आहे.

सिंहगड रस्त्यावरदेखील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या दोन्ही पुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा हट्ट भाजपचे आमदार आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्यापही वेळ मिळालेली नाही. पूल वाहतुकीसाठी खुले करावेत आणि नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

असा आहे दुमजली उड्डाणपूल

पुणे विद्यापीठ चौक – गणेशखिंड रस्ता

– लांबी : ५५ मीटर, रुंदी : १८ ते २० मीटर

– औंध व शिवाजीनगरकडे जाणारे रॅम्पचे काम पूर्ण

– प्रवासाचा वेळ वाचणार, इंधन बचत आणि वाहतुकीतील प्रदूषणात घट

– सिग्नलवरील ताण कमी होणार, अधिक सुरक्षित आणि सुसंगत वाहतूक प्रवाह

गणेशखिंड रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी निवेदन देऊन त्यांची वेळ मागण्यात आली आहे. १५ ऑगस्टला याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. – सिद्धार्थ शिरोळे, आमदार, शिवाजीनगर