महापालिकेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत हडपसर परिसरात स्वत:च्या नावे उभारलेल्या उद्यानाचे स्वत:च उद्घाटन करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर आता उद्यानाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे उद्यान नव्हे तर धर्मवीर आनंद दिघे उद्यान असे महापालिकेच्या उद्यानाचे नामकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची घोषणा केली. दरम्यान, सायंकाळपर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सायंकाळी उद्घाटन करण्याच्या हालचाली शिंदे गटाकडून सुरू झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या मुख्य सभेने केलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवत शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरातील या उद्यानाला एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. त्याचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये मंगळवारी (२ ऑगस्ट) प्रसिद्ध झाले. त्याचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रात उमटले. उद्यानाला दिलेल्या नावावरून टीका झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शिंदे यांच्यावर ओढविली. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उदय सामंत यांनी स्थानिक माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्याशी संपर्क साधला. या दरम्यान, उद्यानाचे नाव बदलून ते धर्मवीर आनंद दिघे करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले.

पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्याना’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आजच होणार होतं उद्घाटन पण…

‘मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. एखाद्या नगरसेवक किंवा कार्यकर्त्याने माझ्या नावाने जर उद्यान केले असेल तर ते मला मान्य नाही, त्यामुळे उद्यानाचे नाव बदलावे’, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर नाना भानगिरे यांच्याशी संपर्क साधून नाव बदलण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

नामकरणाबाबत रीतसर प्रशासकीय परवानगी घेतली जाईल –

ते म्हणाले की, “चुकीच्या पद्धतीच्या कामांची उद्घाटन मुख्यमंत्री करणार नाहीत. नामकरणाबाबत रीतसर प्रशासकीय परवानगी घेतली जाईल. सायंकाळपर्यंत प्रशासकीय पातळीवरील मान्यता प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तचे या उद्यानाचे उद्घाटन होईल.”

‘एकनाथ शिंदे उद्याना’चे आज मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन! ; वैयक्तिक नाव न देण्याच्या पुणे पालिकेच्या ठरावाला केराची टोपली

महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना देण्यात येणाऱ्या नावांबाबत ठराव केला आहे. या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत. राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune eknath shinde park name changed after criticism now dharmaveer anand dighe udyan pune print news msr
First published on: 02-08-2022 at 14:30 IST