पुणे : पुण्यातील नोकरदारांना कामावर जाण्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय आता उपलब्ध झाला आहे. यासाठी कृत्रिम प्रज्ञाआधारित कार्यालयीन वाहतूक मंच (कॉर्पोरेट मोबिलिटी प्लॅटफॉर्म) असलेल्या रूटमॅटिकने इन्फोसिसच्या सहकार्याने पर्यावरणपूरक वाहनांचा नवीन ताफा सुरू केला. हा ताफा १०० टक्के डिझेल आणि पेट्रोलमुक्त आहे. या ताफ्यात सीएनजी आणि इलेक्ट्रिक इंधन पर्यायाच्या चार आणि सहा आसनी मोटारींचा समावेश आहे. यामुळे शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुण्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्ते अपुरे पडू लागले आहेत. यामुळे शहरात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळेही हवा प्रदूषणात भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छ वाहतुकीच्या दिशेने रूटमॅटिकने पाऊल टाकले आहे. यासाठी इन्फोसिसशी भागीदारी केली आहे.
यामुळे शहरात कार्यालयीन वाहतूक क्षेत्रात पर्यावरण वाहतुकीच्या दिशेने पाऊल पडले आहे. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा फायदा होणार असून, नागरिकांच्या जीवनमानातही सुधारणा होणार आहे.
याबाबत रूटमॅटिकचे संस्थापक व मुख्याधिकारी श्रीराम कन्नन म्हणाले की, पुण्यात हरित वाहतुकीचा नवा मानदंड स्थापित करण्याची आघाडी आम्ही घेतली आहे. शहरात १०० टक्के डिझेल आणि पेट्रोलमुक्त वाहतूक सेवा सुरू करण्याचे पहिले पाऊल आम्ही उचलले आहे. यातून शाश्वत भविष्यासाठी कार्यालयीन वाहतूक क्षेत्रात अमूलाग्र बदलाच्या दिशेने वाटचाल अपेक्षित आहे.
आयक्यूएअरच्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२४नुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत. या वाढत्या प्रदूषणामध्ये वाहनांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाचा मोठा वाटा आहे. रूटमॅटिकचा हा उपक्रम देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी एक योग्य पाऊल ठरेल, अशी आशा आहे.
साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना सेवा
रूटमॅटिकची स्थापना २०१३ मध्ये झाली. ही वाहतूक सेवा कंपनी आहे. कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून कंपनीकडून प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह सेवा दिली जाते. कंपनी सध्या २३ शहरांतील ३०० कंपन्यांमध्ये साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना सेवा पुरवते. रूटमॅटिकला ४कोटी डॉलरची महत्त्वाची गुंतवणूक मिळाली आहे. ही गुंतवणूक कंपनीला भविष्यातील सेवा विस्तारासाठी महत्त्वाची ठरेल. कंपनीने मार्च २०२६ पर्यंत १० हजार वाहने ताफ्यात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.