पुणे : ‘सामाजिक परिवर्तन एकदम होत नाही. सद्विचारी लोकांच्या एकत्र येण्यातून ते घडते. मात्र, त्यासाठी सकारात्मक गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करायला हवा,’ असे मत पर्यावरणतज्ज्ञ आणि लेखक दिलीप कुलकर्णी शुक्रवारी व्यक्त केले.
राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र यांच्या वतीने एका अनौपचारिक कार्यक्रमात दिलीप माजगावकर यांच्या हस्ते दिलीप कुलकर्णी यांना ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी कुलकर्णी बोलत होते. राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे, डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्राच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे आणि सचिव वर्षा गजेंद्रगडकर आदी या वेळी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ‘उपयोग, उपभोग आणि अर्थार्जन हे जगण्याचे आवश्यक घटक आहेत. मात्र, या तिन्ही घटकांना मर्यादा असली, तरच निसर्ग अबाधित राहून माणूस समाधानी आयुष्य जगू शकतो. आपला ठाम निर्धार असेल आणि निसर्गाशी संवादी होऊन जगण्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर निसर्गस्नेही जीवनशैली अजिबात अवघड नाही. विनाश की विकास यांपैकी आपल्याला कोणती वाट निवडायची आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे. एकट्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी बदल घडणार नसला, तरी निदान आपल्या अंतर्मनाने दाखविलेल्या वाटेवर चालण्याचे समाधान असते.’
‘मराठी वाचकांना आणि पर्यावरणाच्या अभ्यासकांना पर्यावरणाच्या प्रश्नांचा केवळ परीघ आणि त्यांची व्याप्ती दाखवण्यापेक्षा या प्रश्नाच्या केंद्रबिंदूकडे घेऊन जाणारे दिलीप कुलकर्णी हे विचारशील आणि कृतिशील लेखक आहेत,’ असे गजेंद्रगडकर यांनी सांगितले. ‘वरवरचे उपाय करून पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांच्या मुळाशी जाऊन एकात्मिक पद्धतीने पर्यावरणाचा विचार करण्याची गरज दिलीप कुलकर्णी यांच्या लेखनातून सातत्याने अधोरेखित होत राहिली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
ढेरे म्हणाल्या, ‘दिलीप कुलकर्णी यांची जीवनदृष्टी ही सध्याच्या काळाची आत्यंतिक गरज आहे. आपल्या ठाम विचारसरणीतून आणि प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाच्या विवेकी संतुलनाचे धडे देणारे दिलीप कुलकर्णी यांच्यासारखे लेखक दुर्मीळ आहेत.’
‘दिलीप कुलकर्णी हे श्रीगमांची विचारधारा आणि विधायकता पुढे नेणारे लेखक आहेत,’ असे सांगून माजगावकर म्हणाले, ‘स्वतःच्या निसर्गस्नेही जीवनशैलीतून दिलीप कुलकर्णी यांनी निसर्गाचा गरजेपुरताच वापर करण्याचा धडा घालून दिला आहे.’ डाॅ. बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.