पिंपरी : ऑनलाइन जेवण मागविण्यासाठी (फूड डिलिव्हरी) बनावट आयडी वापरल्याचा जाब विचारल्यामुळे घरपोच खाद्य पदार्थ पुरविणाऱ्याला (डिलिव्हरी बॉय) तिघांनी मारहाण केल्याची घटना पिंपळे गुरवमधील एका सोसायटीजवळ घडली.
या प्रकरणी २० वर्षीय तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी थांबले असताना आरोपीचा भाऊ बनावट आयडी वापरून ऑर्डर देत होता. त्याचा जाब विचारल्यामुळे आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपीने हातातील लोखंडी कडे फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच, फिर्यादीच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
वायसीएममध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरणारा अटकेत
पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय परिसरात वावरणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या एका चोरट्याला संत तुकाराम नगर पोलिसांनी अटक केली. एक मोबाईल चोरी केल्यानंतर तो दुसरा गुन्हा करण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आनंद श्रीराम पाटील (४६, रा. लांडगे नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनीलकुमार आंबन्ना नागोरे (२८, आंबेठाण, खेड) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलकुमार यांच्या पत्नीला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ते औषधे आणण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या गेट बाहेर आले होते. त्यावेळी त्यांचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन एका चोरट्याने चोरून नेला. याबाबत सुनीलकुमार यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर तो चोरटा पुन्हा वायसीएम रुग्णालयाच्या गेट समोर चोरी करण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये कंपनीची दहा लाखांची फसवणूक
एका लेखापालाने ग्राहकांकडून मिळालेली दहा लाख ५७ हजार रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कंपनीची फसवणूक केल्याची घटना चिंचवड येथे घडली. या प्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लेखापालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या कंपनीमध्ये आरोपी लेखापाल म्हणून नोकरी करत होता. त्याने १५ ग्राहकांकडून दहा लाख ५७ हजार ७७९ रुपये रोख रक्कम घेतली. ग्राहकांना पैसे जमा झाल्याची पावतीही दिली;परंतु ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा केली नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
चिखलीत कामगाराकडून सात लाखांचा अपहार
एका कामगाराने आपल्या मालकाचा विश्वास संपादन करून पगारासाठी आणि इतर कामांसाठी घेतलेले एकूण सात लाख ३३ हजार ३०० रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे चिखलीतील सुदर्शननगर येथे उघडकीस आले. या प्रकरणी एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार कामगाराविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या वॉशिंग सेंटरमध्ये काम करत असताना पगारासाठी एक लाख ८५ हजार रुपये, गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवण्यासाठी पाच लाख रुपये आणि क्रेडिट कार्डद्वारे ४८ हजार ३०० रुपये घेतले. त्याने ही रक्कम फिर्यादीला परत न करता त्याचा अपहार केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.
शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने मारहाण
फोनवरून शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना दिघी रोड येथे घडली. या प्रकरणी ४४ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोन करून शिवीगाळ व धमकी दिली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी घटनास्थळी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादीच्या डोळ्याला, नाकाला आणि ओठाला दुखापत झाली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी आंबेठाण ते वासुली रोडवर घडली. प्रभाकर दत्तात्रय गुंजाळ (३७, कोरेगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संतोष मारुती गुंजाळ (३०, कोरेगाव बुद्रुक) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालक ट्रक निष्काळजीपणे चालवत होता. त्याने समोर जाणाऱ्या दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार प्रभाकर हे खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
