पुणे : ‘थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीची कमी दरात विक्री करण्यात येणार असल्याने पाचशे कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे, असा आरोप यशवंत बचाव शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे.

‘थेऊर येथे सध्या सरासरी वीस लाख रुपये गुंठा असा जमिनीचा दर सुरू आहे. कारखान्याच्या शंभर एकर जमिनीला बाजार मूल्य दराने किमान सात कोटी रुपये प्रतिएकर दर मिळायला हवा. ७०० कोटी रुपयांची जमीन २३१ कोटी २५ लाखाला दिली जाणार आहे. या व्यवहारात कारखान्याचे म्हणजेच सभासद शेतकऱ्यांचे ४६९ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे,’ असे लवांडे यांनी सांगितले.

कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त शंभर कोटी रुपये लागतात. त्यासाठी वीस एकर जमिनीची विक्री केली तरी ती गरज भागणार आहे. शंभर एकर जमीन विकण्याची आवश्यकता नाही. जमिन विक्रीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाचा हा निर्णय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाईल, असेही लवांडे यांनी स्पष्ट केले.

आर्थिक अनियमिततेमुळे तोट्यात आलेला यशवंत सहकारी साखर कारखाना काही वर्षांपासून बंद आहे. कारखान्याकडील जमिनीची विक्री करून हा कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी मागणी सातत्याने होत होती. साखर कारखान्याच्या ९९ एकर २७ आर जमिनीची विक्री करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. २३१ कोटी २५ लाख रुपयांना ही विक्री करता येणार आहे. मंत्रिमंडळाने गेल्या काही दिवसांपूर्वी जमिन विक्री करण्यास मान्यता दिली आहे.