पुणे : बंडगार्डन रस्त्यावरील दुचाकी विक्री दालन, तसेच दुरुस्ती केंद्रात सोमवारी रात्री आग लागली. आगीत ६० दुचाकी जळाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दालनात अडकलेल्या एकाला जवानांनी सुखरुप बाहेर काढले. आगीत दालनातील साहित्या, टेबल, खुर्ची, तसेच कागदपत्रे जळाली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग चौकात एका दुचाकी विक्री कंपनीचे दालन आहे. तेथे दुचाकींची देखभाल आणि दुरुस्ती केंद्र आहे. तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या दुचाकी विक्री दालनातून सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. काही क्षणात दुचाकी विक्री दालनातील दुचाकींनी पेट घेतल्याने आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नायडू आणि येरवडा केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग भडकल्याने अग्निशमन दलाच्या मुख्या केंद्रातून टँकरही मागविण्यात आले. दालनातील दुचाकींनी पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. जवानांनी दालनाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
दालनात कोणी अडकले नसल्याची खात्री केली. त्यानंतर एक जण दालनात असल्याची माहिती मिळाली. जवानांनी एकाला सुखरुप बाहेर काढून पाण्याचा मारा सुरू केला. धूर मोठ्या प्रमाणावर झाल्याने जवानांनी सुरक्षेचा उपाय म्हणून श्वसन यंत्रणा परिधान केली. जवानांनी पाण्यााचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत इलेक्ट्रीक दुचाकींसह एकूण ६० दुचाकी जळाल्या. दुचाकी विक्री दालनातील साहित्य, टेबल, खुर्ची, कागदपत्रे जळाली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांनी दिली.
अग्निशमन अधिकारी भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. आग लागल्याची माहिती पोलीस आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तेथे भेट दिली. जवानांनी दुचाकी विक्री दालनातील आग अर्ध्या तासात आटोक्यात आणल्याने गंभीर दुर्घटना टळली.